गणेश इंगवले
नवी मुंबई ़: ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्याचा प्रस्ताव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद मंगळवारी महासभेदरम्यान उमटले.
कोंग्रेसच्या नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्याच्या प्रस्तावाला रद्द करण्याच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात महासभा बैठकीत लक्षवेधी मांडली .यावेळी हेमांगी सोनावणे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
ऐरोली सेक्टर 9 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोंमला मार्बल आच्छादित करण्याचा प्रस्ताव रद्द कसा केला? आयुक्तांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली का ?असा प्रश्न उपस्थित करत सदरचा प्रस्ताव महासभेत मंजूर करून सुद्धा आयुक्तांनी हा प्रस्ताव रद्द करून सभागृहाचा अपमान केला असल्याचा संताप नगरसेविका सोनावणे यांनी व्यक्त केला.
बाबासाहेबांच्या स्मारकात अद्याप अनेक वस्तू आणायच्या आहेत. पण त्या वस्तूंचा अद्यापही प्रस्ताव सभागृहासमोर आणलेला नाही. एखादा प्रस्ताव रद्द करायचा असल्यास त्यांनी तो ठराव सभागृहासमोर आणायला पाहिजे होते. त्यावर लोकप्रतिनिधींची मते जाणून न घेता मार्बलचा प्रस्ताव रद्द केला. हा सभागृहाचा अपमान असल्याचे सांगून नगरसेविका सोनवणे पुढे म्हणाल्या की, या मार्बल आच्छादित डोममुळे नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. आयुक्त साहेब नवी मुंबईत आल्यानंतर नवी मुंबईच्या जनतेला काही तरी नवीन विकास पाहायला मिळेल.पण नवी मुंबईच्या जनतेला काही मिळाले नसल्याने अपेक्षाभंग झाला आहे. नवी मुंबई महापालिकेला डोमवर मार्बल आच्छादित करण्याचा खर्च जर जमत असेल तर आमची नवी मुंबईतील जनता स्मारकासाठी पैसे उभे करेल असे नगरसेविका सोनावणे यांनी यावेळी महासभेदरम्यान सांग्गितले.
जर हा प्रस्ताव पुन्हा मंजूर झाला नाही तर होणार्या उद्रेकाला आयुक्तांना सामेरे जावे लागेल आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी आयुक्त हे स्वतः जबाबदार असतील असा इशाराही यावेळी नगरसेविका सोनावणे यांनी यावेळी दिला.
शिवसेनेचे नगरसेवक संजू वाडे यांनी देखील महासभा बैठकीत काँंग्रेसच्या नगरसेविका हेमांगी सोनावणे यांच्यावतीने मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला अनुमोदन देत, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाविषयी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर रोष व्यक्त करत सांगितले की , वाक विथ कमिशनर करत असताना या वास्तुला भेट का दिली नाही ? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न हा अवघ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे स्मारकाच्या डोमवर मार्बल आच्छादित करण्याचा मंजूर केलेला प्रस्ताव रद्द करणे म्हणजे आंबेडकरी जनतेच्या स्वप्नांना तिलांजली देणे असे आहे. एखाद्या कामात बाबासाहेबांचे नाव आल्यावर नेहमी विरोध होतो.पण आम्ही त्याविरोधाला न जुमानता अधिक बळाने ते काम पूर्ण करून घेतोच, वॉक विथ कमिशनरच्या माध्यमातून आपण ऐरोली मध्ये आले. पण स्मारकाच्या कामाला भेट दिली नाही. स्मारकाचे 15 ऑगस्टला उदघाटन करता येईल असं आयुक्तांनी घोषित कसे केले. नवी मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय लोकपर्ण होऊ देणार नाही असा खणखणीत इशारा नगरसेवक वाडे यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला दिला.
डोमवर राजस्थान मधील अतिउच्च प्रतीचा माकवना मार्बल लावण्यात येणार असल्याने तो मार्बल खराब अथवा त्यावर शेवाळ बसणार नाही, अशी माहिती समोर आल्यानंतरच मार्बल आच्छादित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आय आय टी सारखी मोठी संस्था अगदी 15 दिवसांत सर्वे करून अहवाल सुद्धा देते. पण तीच आय आय टी वाशीतील धोकादायक इमारतींच्या सर्वेचा उत्तर द्यायला सहा महिने लावते. त्यामुळे स्मारकाबाबत दिलेल्या अहवालात काही तरी गौडबंगाल आहे. मुंबईत बाबासाहेबांचे भवन पाडले गेल्या नंतर दलित समाजाचा झालेला उद्रेक सर्वांनी पहिला आहे.असं असताना नवी मुंबईतील जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका. महापालिकेच्या प्रशासनाचे दुटप्पी धोरण जनता स्वीकारणार नाही, आयुक्तांना पेपरबाजी करून लोकप्रियता मिळवण्याची मोठी हाव झाली आहे, असा आरोपही नगरसेवकांकडून यावेळी करण्यात आला.
जनतेच्या भावनांचा विचार करून स्मारकाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी एका समितीची स्थापना करा. प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या. हा निर्णय चुकीचा असून तो महागात पडणार आहे .जनतेला पेटवन्याचे काम आयुक्तांनी केले आहे .आम्ही आयुक्तांची दुटप्पी भूमिका खपवून घेतलीं जाणार नाही, अशी भूमिका मांडत नगरसेवकांनी महासभेदरम्यान आपला संताप व्यक्त केला.