गणेश इंगवले
नवी मुंबई : नारळी पौर्णिमेच्या सणाची महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात तयारी जोरदार सुरू असली तरी नवी मुंबईकरांना मात्र सारसोळेच्या जेटीवर सारसोळेच्या ग्रामस्थांकडून साजर्या केल्या जाणार्या नारळी पौर्णिमा उत्सवाचे कमालीचे आकर्षण आहे.
पामबीच मार्गालगत असलेल्या सारसोळेच्या जेटीवर साजरा होत असलेल्या नारळी पौर्णिमा उत्सवाचे आकर्षण नवी मुंबईकरांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये कमालीचे वाढीस लागले आहे. सारसोळे गावातील कोळीवाड्यातून कोलवाणी माता मित्र मंडळाकडून काढण्यात येणार्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी हे सारसोळे गावच्या नारळी पौर्णिमा सणाचे आणखी एक आकर्षण असते. सारसोळे कोळीवाड्यातून ही पालखी सारसोळे जेटीपर्यत जाते व तेथून पुढे नारळ खाडीमध्ये वाहाण्यासाठी ग्रामस्थ घेवून जातात. सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाकडून आयोजित पालखी सोहळ्यामध्ये सर्वपक्षीय नेतेमंडळी, नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक, सहकार व सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी तसेच पत्रकारदेखील मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
बुधवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सारसोळे कोळीवाड्यातून ही पालखी निघणार असून या पालखी सोहळ्यात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी केले आहे.