* आ. मंदाताई म्हात्रेंच्या परिश्रमातून जेटीची उभारणी
* स्मार्ट दिवाळे गाव बनविण्याची मंदाताईंची ग्वाही
नवी मुंबई : दिवाळे गावातील फगवाले मच्छीमार स्वयंसेवी संस्थेतील मच्छीमार बांधवांना मच्छीची चढउतार करणे सुरक्षित आणि सुलभ जावे याकरिता ‘बेलापूर’च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने जेट्टी उभारण्यात आली आहे. मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सदर जेट्टीकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अथक प्रयत्न करुन ३ कोटी ७४ लाख रुपये निधी मंजूर करुन घेतला आहे. सदर जेट्टीचे उद्घाटन नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आमदार म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ‘भाजपा’चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मारुती भोईर, माजी जिल्हाध्यक्ष भगवानराव ढाकणे, स्थानिक नगरसेविका भारती कोळी, फगवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनंता कोळी, डॉ. राजेश पाटील, बाळासाहेब बोरकर, सुनिल होनराव, लक्ष्मी कोळी, ज्ञानेश्वर कोळी तसेच दिवाळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळे गावात आतापर्यंत खांदेवाले, फगवाले, डोलकर, आदि मच्छीमार संस्थांना जेट्टी उभारण्याकरिता ४.५० कोटी रुपये खर्च केले आहेत.
एकंदरीतच दिवाळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे १५ कोटी रुपये विकास निधी खर्च करणार असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे जेट्टी उभारण्याबरोबरच मासळी ठेवण्यासाठी ६० गाळे निर्माण करणार आहोत. त्याशिवाय दिवाळे गावाकरिता रस्ते, मासळी-भाजी मार्केट, पार्किंग व्यवस्था, अत्याधुनिक मंगल कार्यालयासाठी हॉल निर्माण करण्यात येणार असल्याचे माहिती आमदार म्हात्रे यांनी दिली.
तसेच सदरच्या कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात केली जाणार असून गावाचे सुशोभिकरण आणि विकास काम यामुळे दिवाळे गाव स्मार्ट होणार असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच सीआरझेड मध्ये असलेली गांवठाणे आणि कोळीवाडे सदर नियमातून वगळण्यात यावे अशी मागणी असणारे निवेदन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याचे आ. म्हात्रे म्हणाल्या.
दरम्यान, नवी मुंबईतील पूर्वीच्या राजकीय नेत्यांनी विकास कामे करताना आपल्या कामात अनेक अडथळे निर्माण केले होते. पण, आता सरकार आपले आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा विकास निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करु, असे आश्वासन आ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिले.