- मुंबई : मृत वृक्षांवर पेंटिंग करुन तयार करण्यात आलेले आकर्षक सेल्फी पॉर्इंट मुंबईकरांसाठी मृत्युचा सापळा ठरण्याचा धोका आहे़ त्यामुळे अशी दुर्घटना टाळण्यासाठी लवकरच याचे सर्वेक्षण केल्यानंतर ही मृत वृक्ष तोडण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासन घेणार आहे़
सुखलेली, मृतावस्थेत असलेल्या वृक्षांवर पेंटिंग करुन त्या ठिकाणी सेल्फी पॉर्इंट तयार करण्याची संकल्पना अलीकडेच साकार झाली आहे़ सेल्फीचे वेड असलेली तरुणाईही अशा वृक्षांच्या आसपास पोज घेऊन सेल्फी घेत असतात़ माटुंगा, दादर आणि शिवाजी पार्क अशा ठिकाणी असे सेल्फी पॉर्इंट्स आहेत़ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या जागांचे क्रेझ आहे़.
मात्र मुळात ही वृक्ष मृत असल्याने ते कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका आहे़ यामुळे पादचारी जखमी होऊ शकतात़ अथवा एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, अशी भीती वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी नुकतीच व्यक्त केली़ त्यामुळे असे वृक्ष तात्काळ तोडण्यात यावे अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली़
*** हे सेल्फी पॉर्इंट्स बेकायदाच
माटुंगा, दादर येथील हौशी नागरिकांनी असे सेल्फी पॉर्इंट्स तयार केले आहेत़ मात्र हे पॉर्इंट बेकायदा असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी या वृक्षांना तोडण्यात यावे, अशी सुचना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली़ हा मुद्दा नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी उपस्थित केला होता़
** मृत वृक्षांचे सर्वेक्षण होणार
अशा मृत वृक्षांचे सर्वेक्षण करुन या सेल्फी पॉर्इंटच्या सुरक्षेची चाचपणी पालिका करणार आहे़ त्यानंतर हा अहवाल आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात येईल़ तेच या वृक्षांचे भवितव्य ठरविणार आहेत़
** मृतांच्या नातेवाईकांना जादा मदत
वृक्ष कोसळून मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एक लाख रुपये नुकसान भरपाई सध्या देण्यात येते़ मात्र यामध्ये वाढ करुन पाच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सदस्यांनी केली़