जीएसटी विधेयक मंजुरीसाठी राज्याचं विशेष अधिवेशन
- मुंबई : आसाम, झारखंड, छत्तीसगड आणि बिहारमध्ये वस्तू आणि सेवाकर विधेयक (जीएसटी) मंजूर करण्यात आलं. आता महाराष्ट्रात जीएसटी विधेयक लागू करण्यासाठी युती सरकारनं विधिमंडळाच्या एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याची तारीख निश्चित होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
-
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले जीएसटी विधेयक मागच्या काही दिवसांपूर्वीच राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाले. संसदेच्या मान्यतेनंतर २९ पैकी अर्ध्या राज्यांची मंजुरी जीएसटी विधेयकाला मिळाल्यानं त्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी विधेयक सर्व राज्यांनी लवकरात लवकर लागू करावं, असं आवाहन केलं होतं. त्याच दृष्टीनं राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.