महापौेर सुधाकर सोनवणेंची आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर नाराजी
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेतील नगरसेवकांना जुमानत नाहीत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे नगरसेवक आणि अधिकारी-कर्मचारी रडकुंडीला आले आहेत. जर महापालिका आयुक्त सर्व काही करणार असतील तर लोकप्रतिनिधींचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी महापौर आणि नगरसेवक देखील मंत्रालयातून प्रतिनियुक्तीवर घेऊन यावेत, अशा संतापजनक शब्दात ‘नवी मुंबई’चे महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या महापालिका आयुक्त विरुध्द सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. महापालिका आयुक्तांनी पहिल्या दिवसापासून आपल्याला अपमानाचा धडाका लावला आहे. गेल्या साडेतीन महिन्यात महापालिका आयुक्तांनी कोणत्याही निर्णयाबाबत आपल्याशी सल्ला मसलत केलेली नाही. महापालिका सभागृहात होणारे निर्णय जर महापालिका आयुक्त परस्पर रद्द करणार असतील तर महापालिका सभागृहाला कोणताच अर्थ उरत नाही. नवी मुंबई शहराचे सर्व प्रश्न जर ‘वॉक विथ कमिशनर’ या कार्यक्रमात सुटत असतील तर नगसेवकांचीही काहीच गरज नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी महापौर आणि नगरसेवक देखील मंत्रालयातून प्रतिनियुक्तीवर घेऊन यावेत, असा उपरोधीक टोलाही महापौर सुधाकर सोनवणे यांनी लगावला आहे.
महापालिका अधिकार्यांना निलंबित केले जात आहे. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. एकीकडे महापालिकेच्या अधिकार्यांना कडक शिस्तीत ठेवले जात असले तरी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्यांना माञ मोकाट सोडण्यात आले आहे, अशी टिकाही महापौर सुधाकर सोनवणे यांनी केली. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या या जाहीर नाराजीमुळे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.