अवजड वाहनांच्या विळख्यात अडकले कळंबोली शहर, रोडपाली गाव
पनवेलः पोलीस प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे विषारी वायु आणि अति ज्वलनशिल रासायनिक पदार्थांने भरलेल्या अवजड टॅकर आणि वाहनांचा वेढा कळंबोली शहर, रोडपाली गावाला पडत आहे. या विरोधात
कळंबोली शहर, रोडपाली गाव मध्ये अत्यंत धोकादायक वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २१ ऑगस्ट रोजी कळंबोली हायवे जंक्शन येथे ‘भाजप’तर्फे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.
कळंबोली वसाहत निर्माण झाल्यापासून कळंबोली वसाहत आणि रोडपाली गावाला बेकायदा अवजड वाहनांच्या विळख्याला सामोरे जावे लागत आहे. यामुळे विविध सामाजिक गंभिर समस्या निर्माण होऊन कळंबोली वसाहती मधील सामाजिक शांतता भंग होत आहे. बेकायदा वाहने पार्कीग वरुन कळंबोली वसाहतीमध्ये वाहन चालक- मालक आणि कळंबोली, रोडपाली ग्रामस्थ यांच्या मध्ये दंगल उसळली होती. त्यावेळी कळंबोली वसाहतीमध्ये अवजड वाहनांना कायमची बंदी करण्यात आली होती. याशिवाय अवजड वाहनांच्या पार्कीगची व्यवस्था अन्य स्थळी करण्यात आली होती. तसेच कळंबोली वसाहतीच्या चारही बाजूंना सिडको प्रशासनाने हाईटगेट बसवून अवजड आणि मोठ्या वाहनांना कळंबोलीमध्ये कायमची बंदी केली होती. मात्र, मुजोर अवजड वाहनचालकांनी हाईटगेट तोडुन किंवा अन्य मार्गाने कळंबोली वसाहतीमध्ये प्रवेश करून रहिवाशांना वेठीस ठरले आहे. कळंबोली मधील नागरिकांनी गेल्या २५ वर्षापासून सिडको, नवी मुंबई पोलीस प्रशासन आणि राज्य शासनाकडे लेखी पत्रव्यवहार करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कळंबोली वसाहत अवजड वाहनांच्या पार्कीगने मुक्त होऊ शकली नाही, असे काशिनाथ म्हात्रे यांनी सांगितले.
कळंबोली वसाहतीमध्ये रात्रीच्या वेळी अवजड वाहने मोठया संख्येने बेकायदा उभी केली जातात. यामध्ये अंत्यत ज्वलनशिल पदार्थ, रासायनिक पदार्थ, डिझेल, पेटोल यांनी भरलेल्या मोठ्या टँकरांचा समावेश असतो. उभ्या करण्यात आलेल्या ज्वलनशिल टँकरच्या केबिनमध्ये रात्री स्टोव्ह पेटवुन जेवण शिजवण्याचा अघोरी प्रकार केला जातो. यामुळे कळंबोली वसाहतीचे भोपाळ होण्याची शक्यता रहिवाशी व्यक्त करीत आहेत. तसेच वाहनचालकांकडून अनेक सामाजिक तणाव निर्माण होईल अशी कृत्ये केली जातात. त्यामुळे कळंबोली वसाहतीमधील सामाजिक शांततेला तडा जात आहे. मात्र, शासनाचे याकडे लक्ष नाही. काही वाहतुकदारांनी तर आपली कार्यालयेच कळंबोली वसाहतीमध्ये थाटली असून, अवजड वाहनांची बेकायदा पार्कींग केली जात आहे. अवजड वाहनाच्या पार्कींगसाठी कळंबोली लोखंड बाजारात वाहनतळ असूनही वाहने कळंबोली वसाहतीमध्ये पार्क केली जातात. या विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कळंबोली जक्शंन येथे रास्ता रोको आंदोलन करून झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘भाजयुमो’चे पनवेल तालुका अध्यक्ष अमर पाटील यांनी दिली.
रास्ता रोको आंदोलनात कळंबोली वसाहत, रोडपाली गांव मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमर पाटील यांनी केले आहे.