* खारफुटीचा अडथळा रेल्वे मंत्रालय सोडविणार
* भूसंपादनाची जबाबदारी सिडको पूर्ण करणार
नवी मुंबई : खारफुटी आणि भूसंपादन यामुळे नियोजित मुदतीपेक्षा जवळपास तीन रखडलेला नेरुळ ते उरण या २७ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गातील अर्धा भाग पुढील वर्षी सुरु करण्याचा निर्णय रेल्वे आणि सिडको प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सदरचा रेल्वे मार्ग सुरु करण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या कामाला गती देण्याच्या सूचना ‘सिडको’ने केल्या आहेत. या काळात पुढील मार्गातील खारफुटीचा अडथळा रेल्वे मंत्रालय सोडवणार आहेत. भूसंपादनाची जबाबदारी सिडको पूर्ण करणार आहे.
नवी मुंबईला वरदान ठरणारे मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे असे दोन मोठे प्रकल्प पूर्ण केल्यामुळे मुंबई-नवी मुंबई दरम्यान रेल्वेचे जाळे चांगल्या प्रकारे तयार झाले आहे. नवी मुंबईत रेल्वेचे जाळे उभारुन नवी मुंबईचा झपाट्याने विकास करण्याच्या उद्देशाने ‘सिडको’ने नवी मुंबईतील रेल्वे मार्ग आणि रेल्वे स्थानक यातील खर्चाचा ६७ टक्के हिस्सा उचलला आहे. सदर दोन मोठ्या रेल्वे मार्गानंतर जुलै १९९७ रोजी नेरुळ-उरण या २७ किलोमीटर मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. या प्रस्तावित मार्गावर १० रेल्वे स्थानके बांधली जाणार आहेत.
१७८२ कोटी रुपये खर्चाच्या या रेल्वे प्रकल्पाला जून २०१२ रोजी प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली असून नेरुळ ते खारकोपर या १६ किलोमीटर मार्गाचे काम सध्या पूर्णात्वास आले आहे. त्यानंतरच्या चार किलोमीटर मार्गात खारफुटी आणि भूसंपादनाच्या अडथळा आलेला आहे. विशेष म्हणजे नेरुळ-उरण मार्गात उलवा खाडीवर खाडीपुल बांधण्यात आलेला आहे.
सिडको आणि रेल्वेने खारकोपर ते उरण या मार्गावरील काम हाती घेतले असून संपूर्ण मार्गात ४ उड्डाणपुल आणि १५ भुयारी उड्डाण मार्ग तसेच ७८ छोटे नाले बांधण्यात येणार आहेत.