मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधावर नाराज असलेल्या दहीहंडी समन्वय समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाण्यास नकार दिला आहे. सोबतच यंदा नियमात राहूनच दहीहंडी साजरी करा, असा सल्लाही दिल्याने राज्य सरकारकडे अपेक्षेने गेलेल्या दहीहंडी समन्वय समितीची निराशा झाली आहे.
18 ऑक्टोबरच्या सुनावणीवेळी महाधिवक्त्यांना न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्याची विनंती करु, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने बाल गोविंदावरील बंदी कायम ठेवताना दहीहंडींची कमाल उंची २० फुटांपेक्षा जास्त नसावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या नियमांबद्दलचा संभ्रम दूर झाला आहे. या निर्णयावर राजकीय पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. गोविंदा पथकांमध्येही या निर्णयामुळे निराशा पसरली आहे. राजकीय पक्षांसह गोविंदा पथकांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करतानाच हे प्रकरण राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडता आले नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. परिणामी, आता उत्सवावेळी गोविंदा पथकांवर कारवाई होणार नाही, याची काळजीही राज्य सरकारनेच घ्यावी, अशा प्रतिक्रिया संबंधितांनी व्यक्त केल्या आहेत.