मुंबई : ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टना अपघात होतात, क्रिकेट खेळताना खेळाडू जखमी होतात म्हणून कुणी त्या खेळावर बंदी घालते का? दहीहंडीच्या उत्सवात गोविंदा जखमी होतात म्हणून त्यावर निर्बंध का घातले जात आहेत? न्यायालयाने प्रत्येक गोष्टीत नाक खुपसू नये.
निर्णय घेताना डोकं ठिकाणावर ठेवावे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडीबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आपला संताप व्यक्त केला. निर्बंध फक्त हिंदू सणालाच का लावले जातात, असा मुद्दा उपस्थित करून त्यांनी या निर्णयाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न केला.
दहीहंडी उत्सवातील जीवघेणी स्पर्धा आणि लाखोंच्या मोहाने लावलेले जाणारे धोकादायक थर यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. १८ वर्षाच्या खालचा गोविंदा नसावा, तसेच २० फुटापेक्षा जास्त उंच थर लावले जाऊ नयेत, असे न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.