नवी मुंबई: सुमारे १२०० कोटी खर्चून बांधण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग सध्या सर्वसामान्य करदात्यांसाठी मृत्युचा सापळा बनत चालला आहे. गत १६ ऑगस्ट २०१६ रोजी संध्याकाळच्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावर शिरवणे पुलावर खड्ड्यांमुळे दुचाकीकरील कमलाकर मोकल (५१) आणि संगिता उबाळे (४७) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे सदर प्राणांतिक अपघाताला सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी-कार्यकारी अभियंता यांच्यासह संबंधीत उपअभियंता आणि कंत्राटदार यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’तर्फे मुख्यमंत्री आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
सध्या सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे १६ ऑगस्ट रोजी दुचाकी धीम्या गतीने जात असताना मागून आलेल्या डंपरची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. सदरचे प्रकरण गंभीर असून पीडब्ल्युडीचे अधिकारीअभियंते, संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री यांच्या असंवेदनशिलतेमुळे सदरचा अपघात घडल्याचे ‘मनसे’तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील खड्डे नैसर्गिक कारणांमुळे न पडता पीडब्ल्युडी विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांनी महामार्गाच्या देखभालीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पडले आहेत. इतके अपघात घडून सुध्दा पीडब्ल्युडीच्या अधिकारीअभियंत्यांनी झोपेचे सोंग घेतल्याप्रमाणे सदर अपघातांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ‘मनसे’चे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे.
करोडो रुपयांची कंत्राटे देऊन सुध्दा रस्त्यांची अशी दयनीय अवस्था होते, त्यावर पीडब्ल्युडी विभाग आणि संबंधित कंत्राटदार काहीच ठोस कार्यवाही करीत नसल्याबद्दल गजानन काळे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात तर घडतच आहेत; पण त्याचबरोबर या महामार्गावरील प्रवासादरम्यान लोकांचा वेळ देखील वाया जात आहे. वास्तविक पाहता महामार्गाची दुर्दशा होताच क्षणी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रस्ते कंत्राटदाराकडून तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करुन घेणे अपेक्षित होते. पण, तसेच संबंधितांकडून झालेले नाही. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे आणि या खड्ड्यांमुळे झालेल्या प्राणांतिक अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभाग, या खात्याचे मंत्री आणि संबंधित कंत्राटदार यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘मनसे’तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे करण्यात आली आहे.