नवी मुंबई : कडक शिस्तीचे सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराममुंढे यांच्या प्रेमळ स्वभावाची ओळख खारघर मधील गिरीजा अनाथ आश्रम मध्ये दिसून आली. तुकाराम मुंढे यांनी तब्बल एक तास अनाथ मुलांसोबत घालविला.
स्वातंत्र्यदिनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी थेट खारघर सेक्टर-१२ मधील ‘गिरीजा अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रम’ला भेट दिली. या भेटीत तुकाराम मुंढे यांनी प्रथम आश्रमातील सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन अनाथ मुलांना फळे आणि खाऊ वाटप केले.
उच्च शिक्षण घेवून समाजाचे ऋण फेडा, चांगले शिक्षण घेवून उच्च शासकीय अधिकारी होऊन समाजासाठी काम करा, असा सल्ला यावेळी तुकाराम मुंढे यांनी अनाथ आश्रमातील मुलांना दिला.
यावेळी नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण उपस्थित होते. खारघर सेक्टर-१२ मध्ये असलेल्या गिरीजा अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम मध्ये पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणारी २५ मुले आणि २० वृध्द व्यक्ती आहेत.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अचानक ‘गिरीजा अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम’ला भेट दिल्याने भारावून गेलो. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे जसे कडक शिस्तीचे आहेत तसेच खूप प्रेमळ असल्याचे दिसून आले. समाजातील वंचित घटकासाठी काम करीत असल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आश्रमाचे कौतुक केले, अशी प्रतिक्रिया आश्रम संचालक वसंत कुंजर यांनी व्यक्त केली.