नवी मुंबई: नवी मुंबईतील शिरवणे गावावर ‘लेडीज बार’चे गाव असा बसलेला डाग पुसण्यासाठी आता नव्या पिढीतील शिरवणे ग्रामस्थ पुढे सरसावले असून, त्यांनी एकत्रितपणे शिरवणे गावातून ‘लेडीज बार हटावो’चा एल्गार पुकारला आहे.
जवळपास तीसच्या आसपास लेडीज आणि तत्सम बारची संख्या शिरवणे गावात आहे. या बारमध्ये काम करणारे महिला आणि पुरुष देखील शिरवणे गावात वास्तव्य करतात. त्यामुळे, स्थानिक तरुण पिढीलाही ‘लेडीज बार’ या अभद्र संस्कृतीची लागण झाली असल्याची अनेक उदाहरणे हयात आहेत. शिरवणे गावातील लोकांकडे प्रकल्पग्रस्त म्हणून एक रक्कमी पैसा आला आणि सदर पैसा सत्कारणी मार्गाएवजी बारमध्ये खर्च झाला. ज्याचा थेट दुष्परिणाम शिरवणे ग्रामस्थांच्या कुटुंब व्यवस्थेवर झाला आहे.
जागेचा चांगला आर्थिक परतावा मिळतो म्हणून काही शिरवणे ग्रामस्थांनी आपली जागा ‘लेडीज बार’ मालकांना भाडेकरारच्या माध्यमातून आंदण दिली. त्यामुळे शिरवणे गावातील बारची संख्या वाढतच गेली आणि त्यासोबत शिरवणे गावात येणार्या अनोळखी पाहुण्यांची संख्या देखील वाढत गेली आहे. याशिवाय गुन्हेगारीनेही शिरवणे भागात मुक्काम ठोकला आहे. परंतु, सध्याच्या घडीला या सर्वांचा त्रास असह्य झाल्याने किमान येणारी पिढी ‘लेडीज बार’च्या अभद्र जात्यामध्ये भरडली जावू नये अशी इच्छा येथील सुजाण गावकरी उराशी बाळगून आहेत. याकरिता शिरवणे गावातील बार
आणि गावात वास्तव्यास असणार्या बारबालांना गावातून हद्दपार करण्यासाठी शिरवणे गावातील सुजाण नागरिक एकत्रितपणे इतरांमध्ये जनजागृती करणार आहेत, अशी माहिती शिरवणेतील गावातील शिवसेनेचे युवा नेतृत्व विवेक (बुवा) सुतार यांनी दिली.
लेडिज बारमुळे शिरवणे गावची प्रतिमा मलीन होत असून युवा पिढीही रसातळाला जात आहे. बार संस्कृतीच्या विरोधात शिरवणे ग्रामस्थांमध्ये एकजूट झाल्यास नजीकच्या काळात शिरवणे गाव बारमुक्त व व्यसनमुक्त झालेले निश्चितच पहावयास मिळेल, असा विश्वास विवेक (बुवा) सुतार यांनी व्यक्त केला.