मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सीमेवर लढताना सीमेवर लढताना जायबंदी होणाऱ्या जवानांसाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला आहे. 28 सप्टेंबरला लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. सर्व देशवासियांनी सढळ हाताने मदत करण्याचं आवाहन लतादिदींनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. माझ्या वाढिदवसाला भेटवस्तू देण्याऐवजी, चाहत्यांनी सैन्याच्या निधीत योगदान करावं, असं आवाहन लता मंगेशकर यांनी केलं आहे.
‘जवानांसाठी आपण जितकं करु तेवढं कमीच आहे. देशासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणा-या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत. त्यांच्यासाठी जे शक्य असेल ते करणं हेदेखील आपलं कर्तव्य आहे. मी माझ्या वतीने आर्मी वेलफेअर बॅटल कॅज्युअल्टीजमध्ये काही रक्कम जमा करत आहे. तुम्हीदेखील यामध्ये योगदान दिलं तर तुमचे उपकार असतील. माझ्या वाढदिवसाला दरवर्षी तुम्ही ग्रीटिंग कार्ड, फूलं, मिठाई, केक आठवणीने पाठवता, माझी तुम्हाला विनंती आहे की यावर्षी तुम्ही हे सर्व न पाठवता सर्व पैसा जवानांसाठी द्यावा,’ असं आवाहन लतादिदींना ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.