नवी मुंबई : ‘सिडको’चे माजी संचालक तथा ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक नामदेव रामा भगत यांची शिवसेना पक्षाच्या वतीने गोवा राज्याच्या सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गोवा विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना नामदेव भगत यांच्याकडे पक्षाने इतकी मोठी जबाबदारी दिल्याने त्यांच्या नियुक्तीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, नगरसेवक नामदेव भगत यांच्या सदर निवडीचे नवी मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
यापूर्वी ‘नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस’चे अध्यक्ष, ‘प्रदेश कॉंग्रेस’चे सरचिटणीस, नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेता तसेच सिडको संचालक म्हणून् नामदेव भगत यांनी काम केलेले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर नामदेव भगत यांनी ‘कॉंग्रेस’मधून शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेत अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या नामदेव भगत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून पक्षाची बाजू महापालिका सभागृहात आणि सभागृहाबाहेर प्रभावीपणे मांडलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शिवसेना पक्षाने त्यांच्यावर गोवा राज्याच्या सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे.
दरम्यान, गोवा राज्याच्या संपर्कप्रमुख पदी भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जीवन कामत यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी नामदेव भगत यांच्यासह रघुनाथ कुचिक आणि आदेश परब यांच्याकडे देण्यात आली आहे.