* अतिरिक्त आयुक्तांनी स्विकारली नागरिकांची निवेदने
नवी मुंबई: दिघा येथील साने गुरूजी बालोद्यानात 24 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमास काही कारणास्तव आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त (शहर) अंकुश चव्हाण यांनी आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून नागरिकांची निवेदने स्विकारत त्यांच्या अडी-अडचणी, सूचना जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त (सेवा) रमेश चव्हाण तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी नागरिकांनी विशेषत्वाने शौचालय सुविधा, मार्केट, फेरीवाल्यांचे प्रश्न, पार्कींगची असुविधा, अनधिकृत बांधकामे, साफसफाई, मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनाअशा विविध प्रकारच्या अडचणी मांडल्या. प्रत्येकाचे तातडीने कार्यवाही करावयाच्या विषयांबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे संबंधित विभागप्रमुख, अधिकारी वर्गास निर्देश दिले. तसेच धोरणात्मक बाबींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन प्रत्येक कार्यवाहीची माहिती नागरिकांना कळविली जाईल, असे सांगितले.
यावेळी सकाळी 6 पासून मोठ्या संख्येने उपस्थित असणार्या नागरिकांना अंकुश चव्हाण यांनी आपले नवी मुंबई शहर स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी आणि हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यादृष्टीने घरात वैयक्तीक शौचालय बांधण्याकरीता महापालिकेमार्फत देण्यात येणार्या आर्थिक अनुदानाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करतानाच शौचालयांची गरज लक्षात घेऊन महापालिकेमार्फत आवश्यक त्या ठिकाणी सामुदायिक-सार्वजनिक शौचालये उभारली जात असल्याची माहिती अंकुश चव्हाण यांनी दिली. त्याचप्रमाणे नागरिकांना उत्तम सुविधा पुरविण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महापालिका कटिबध्द असल्याचे सांगत सदर सर्व निवेदने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आणून दिली देत त्यावर तत्परतेने योग्य कार्यवाही होईल. शिवाय त्याची माहितीही संबंधित निवेदनकर्त्यास दिली जाईल, असे चव्हाण म्हणाले.