- ठाणे : कोपर्डी अत्याचारातील दोषींना फाशी व्हावी आणि मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत असतानाच १६ आॅक्टोबरला ठाण्यात मराठा मूक मोर्चा काढला जाणार आहे. त्यात सर्व नेते मंडळी केवळ मराठा म्हणून सहभागी होतील, असे रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आयोजित मेळाव्यात जाहीर करण्यात आले.
- या मूक मोर्चाला ठाण्यातील मुस्लिम, पटेल, रजपूत या समाजांनीही पाठिंबा जाहीर केला. या बैठकीला दोन ते तीन हजार मराठा बांधव उपस्थित होते. मोर्चात तब्बल ३० लाख मराठा सहभागी होणार असल्याचा दावा मेळाव्यात करण्यात आला. मोर्चाची सुरु वात तीनहातनाका सिग्नल चौकातून होणार आहे, तर समारोप ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या लाखोंच्या जनसमुदायामुळे व्यवस्था कोलमडू नये, यासाठी मोर्चादिनी टोलनाके टोलमुक्त करावेत तसेच रेल्वेने विशेष लोकल सोडाव्या आणि त्या दिवशी मेगाब्लॉक रद्द करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध नियोजन समित्या स्थापन केल्या असून प्रत्येक मोर्चेकऱ्याने भगवा ध्वज, पाण्याची बाटली व खाणे सोबत आणावे. तसेच मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्वांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शिस्तीचे पालन करावे, अशा सूचना उपस्थित वक्त्यांनी दिल्या. या मेळाव्याला खा.डॉ. श्रीकांत शिंदे, खा. राजन विचारे, ठाण्याचे महापौर संजय मोरे, विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.