- मुंबई : कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित कुर्ला सब-वे (भुयारी) मार्गाची पूर्तता होण्यासाठी २०१७ उजाडणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे व पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
- १४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामासाठी आतापर्यंत मध्य रेल्वेने ३.८४ कोटी खर्च केले आहेत. अजूनही रेल्वेला २.११ कोटी, तर मुंबई महापालिकेला २.९४ कोटी असे एकूण ५ कोटी पाच लाख रुपये खर्च करणे शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पालिका आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाअभावी हे काम रखडले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी त्याबाबत मध्य रेल्वे आणि पालिका प्रशासनाकडे माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती विचारली होती. त्यानुसार, पालिकेचे कार्यकारी अभियंता (पूल) एफ. के. चव्हाण यांनी कळवल्यानुसार, कुर्ला सब-वेची एकूण लांबी १२९.९० मीटर, रुंदी ७.६० मीटर आणि उंची २.६० मीटर इतकी आहे. पालिकेकडे केवळ पश्चिमेकडील पोहोच मार्गाची जबाबदारी आहे. त्याचा एकूण खर्च २ कोटी ९४ लाख ८८ हजार ३८३ आहे. हे काम करण्यासाठी मे. जे. एल. कंस्ट्रक्शन या कंपनीची नेमणूक केली आहे. १५ फेब्रुवारीपासून हे काम सुरू आहे. पूर्ततेचा कालावधी हा पावसाचा कालावधी वगळून ९ महिने इतका आहे.
मध्य रेल्वेचे सहायक कार्यकारी अभियंता (कंस्ट्रक्शन) के. प्रभाकरन यांनी अनिल गलगली यांस कळविले की, आत्तापर्यंत रेल्वेने या कामासाठी ३ कोटी ८४ लाख ४३ हजार खर्च केले आहेत. सोलापूर येथील मेसर्स महेश रूपचंदानी यांनी आॅक्टोबर २०१४ रोजी काम सुरू केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल.