मुंबई : क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रद्द केला असून, महापालिकेने सध्या नव्याने धोरण बनवले असून त्यामध्ये सर्वच मंडईंचा पुनर्विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने क्राफर्ड मार्केटचा पूनविकास त्या धोरणानुसार करण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे.
मुंबईतील मंडईंचा पुनर्विकास करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे बनवण्यात आल्यानंतर मंडईंच्या पुनर्विकासासाठी गाळेधारकांकडून संमती पत्रे घेऊन त्यांच्या पुनर्विकासासाठी प्रस्ताव बनवले जात होते. त्यानुसार महापालिकेच्या १८ मंडईंचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मात्र फोर्टमधील महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या (कॉफर्ड मार्केट) पुनर्विकासासाठी गाळेधारकांनी परिशिष्ट दोन बनवून विकासकांची नेमणूक करत महापालिकेकडे प्रस्ताव मंजुरीला पाठवल्यानंतर सुधार समितीत हा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र हा प्रस्ताव महापालिकेत फेटाळण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने मंडईच्या पुनर्विकासाला स्थगिती दिली. त्यानुसार तत्कालिन अतिरिक्त आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली. या चौकशी समितीने हेरिटेज समितीची मंजूरी व पर्यावरण व वन खात्याची मंजूरी आवश्यक असल्याचे म्हटले होते. सभागृहात या अहवालावर चर्चा झाल्यानंतर तो दप्तरी दाखल करण्यात आला होता.
मात्र त्यानंतर या प्रस्तावावर फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. हेरिटेज समितीने परवानगी नाकारल्यानंतर महापालिकेने या मंडईची दुरुस्ती व विकास स्वत:च करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान येथील गाळेधारकांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने गाळेधारकांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा आणि तोपर्यंत कोणालाही पुनर्विकासाचे काम करण्यास देऊ नये, असे म्हटले होते. परंतु हेरिटेज समितीनेच परवानगी दिलेली नसल्यामुळे तसेच या दरम्यान विकासकाने मंजूर प्रस्तावाप्रमाणे कामच न केल्यामुळे महापालिकेने स्वत: विकासकाचे काम हाती घेतले. त्यामुळे सुधार समितीचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.