- मुंबई : अभिनेता शाहीद कपूरपाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या खार येथील निवासस्थानी डासांच्या उत्पत्तीस्थान आढळून आले आहे. सेन यांनी विविध कारणे देऊन आठ दिवस पालिका कर्मचाऱ्यांना घरात तपासणीसाठी प्रवेश दिला नव्हता. अखेर शुक्रवारी ही पाहणी करुन तिला नोटीस बजावली असून सेनवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
- दोन आठवड्यांपूर्वी विद्या बालन हिला डेंग्युची लागण झाल्यानंतर पालिकेने खार येथील तिच्या निवासस्थानी पाहणी केली होती. त्यावेळीस त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या शाहीद कपूरच्या घरातही डासांच्या उत्पतीचे स्थान सापडले होते. त्यानंतर पालिकेने नुकतीच अभिनेत्री सुश्मिता सेनच्या घराचीही पाहणी केली. खार येथील आंबेडकर मार्गावरील सद्गुरु सुंदरी को.आॅप.सो. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर सेन राहते. या इमारतीमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्यासाठी पालिका पाहणी करीत आहे. मात्र सेनने पालिका कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला होता.
अखेर शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी तिच्या घराची पाहणी केल्यानंतर तीन ठिकाणी असलेली डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली. या प्रकरणी सेनला पालिकेने ३८१ बी अंतर्गत नोटीस बजावली आहे. त्यानुसार तिला दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या वृत्तास कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रीकर यांनी दुजोरा दिला आहे. प्रतिनिधी चौकट या तीन ठिकाणी डासांच्या अळ्या गच्चीवरील ताडपत्रींमध्ये साठलेल्या पाण्यात, भंगार सामान आणि गॅलेरीमध्ये साठलेल्या पावसाच्या पाण्यात एडिस डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. सनदी अधिकाऱ्यांना पालिकेचे अभय मंत्रालयानजिक असलेल्या यशोधन इमारतीमध्ये राहणाऱ्या पाच सनदी अधिकाऱ्यांच्या घरामध्ये एडीस डासांची उत्पत्ती आढळून आली होती. मात्र सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ नोटीस बजाविणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांनी येथील एकाही सनदी अधिकाऱ्याला नोटीस बजावली नाही. या अधिकाऱ्यांनी स्वत:च पाहणीसाठी बोलाविल्याने नोटीस पाठविण्याची गरज नाही, असा बचाव अधिकारी करीत आहेत.