- श्रृती दिगंबर वाघमारे (वय १५,) आबेदा शेख (वय १४) आणि मुस्कान इंतिआज मुलतानी (वय १३, सर्व रा. कासेवाडी) अशी बेपत्ता झालेल्या मुलींची नावे आहेत. यातील श्रृती आणि आबेदाचे मृतदेह आढळून आले असून मुस्कानचा अद्याप शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रृती, आबेदा आणि मुस्कान या तिघीही मैत्रिणी होत्या. आबेदा अँग्लो ऊर्दु हायस्कूलनध्ये ९ वी तर मुस्कान ८ वीमध्ये शिकत होती. तर श्रृती राज धनराजगिरी महाविद्यालयात अकरावीला होती.
गुरुवारी संध्याकाळपासून या तिघींचाही काहीच शोध लागत नव्हता. कुटुंबियांकडून त्यांची शोधाशोध सुरु होती. संध्याकाळी गोळीबार मैदानाजवळील कालव्या शेजारी पडलेल्या दप्तरामधला मोबाईल बराच वेळ वाजत असल्यामुळे तेथून जात असलेल्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना तेथे दप्तर, मोबाईल, ओढणी आणि चपला मिळून आल्या. मोबाईलच्या डिटेल्सवरुन पोलिसांनी मुस्कानच्या घरचा पत्ता शोधला.
कासेवाडी झोपडपट्टीमध्ये पोचलेल्या पोलिसांना या तिनही मुली बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. मिसींगची तक्रार दाखल करुन घेत पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली. रात्रभरात मुलींचा शोध न लागल्याने शुक्रवारी दिवसभर पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. अग्निशामक दलाचे जवान दिवसरात्र पाण्यामध्ये मुलींचा शोध घेत होते.
दरम्यान, मुस्कानच्या मोबाईलवरुन पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तिने मित्राला फोन करुन जगण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या मित्राकडेही चौकशी करण्यात आली. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास श्रृतीचा मृतदेह वानवडीमधील चिमटे वस्ती येथील कालव्यात तर आबेदाचा मृतदेह हडपसर येथील कालव्यामध्ये आढळून आला. मुस्कानचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरुच होता.