औरंगाबाद : एस. टी.वर दरोडा टाकणाऱ्या पाच दरोडेखोरांना मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी दोषी ठरवून प्रत्येकी १० वर्ष सक्तमजूरी आणि मोक्का कायद्यांतर्गत एकुण ४५ लाख रुपये दंड ठोठावला.
निलंगा बस आगारची रोख रक्कम ११ लाख ७४ हजार ५५४ रुपये स्टेट बँक आॅफ इंडीया च्या शाखेत जमा करण्यासाठी एस. टी. चालक दिलीप शिंदे, रोखपाल सूर्यंवशी आणि सुरक्षा रक्षक एस. एन. जाधव घेऊन निघाले. बँकेजवळ एस.टी. थांबविल्यानंतर रोखपाल आणि सुरक्षा रक्षक लोंखडी पेटी घेऊन बँकेत जातांना ४ अनोळखी इसमांनी ती लोंखडी पेटी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार केल्यामुळे दोघांनी गावठी पिस्तुलामधून गोळ्या झाडल्या. यात रोखपाल आणि सुरक्षारक्षकाच्या डोक्यात गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाल लोंखडी पेटी हिसकावून दरोडेखोर कारमधूनपळून गेले.
पोलीस निरीक्षक पी. बी. गायकवाड यांनी बिनतारी संदेश यंत्रणेवरुन जिल्ह्यात नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस पाठलाग करत असल्यामुळे दरोडेखोरकार रस्त्यावर उभी करुन औसा तालुक्यातील भुसनी शिवारातील उभ्या ऊसात शिरले. पोलिसांनी शेताला गराडा घालून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे ऊसाला आग लागली. त्यामुळे दरोडेखोर बाहेर आल्यावर पोलिसांनी कैलास बनसोड , विठ्ठल चांदेकर , रविंद्र पवार , राजकुमार अजयसिंग या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तुल व रोख रक्कम जप्त केली. तपासा दरम्यान हा गुन्हा संघटीत गुन्हेगारांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक एन. डी. गोरे यांनी करुन पाचवा आरोपी शिवाजी निमुर्ळे याला अटक केली. सुनावणीवेळी तत्कालीन सहाय्यक लोकअभियोक्ता राजेंद्र मुगदीया आणि विद्यामान सहाय्यक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी एकुण ३२ साक्षीदारांचे जबाब नोदविले.
सुनावणीअंती न्यायालयाने पाच दरोडेखोरांना भादंवि ३९५ कलमान्वये प्रत्येकी १० वर्ष सक्तमजूरी, २ हजार रुपये दंड, कैलास बनसोडे यास भादंवि ३९७ कलमान्वये ७ वर्ष सक्तमजूरी, १ हजार रुपये दंड, कैलास बनसोडे आणि विठ्ठल चांदेकर यांना भारतीय हत्यार कायद्यान्वये अनुक्रमे ५ वर्ष आणि ३ वर्ष सक्तमजूरी, प्रत्येकी १ हजार रुपये दंड, मोक्का कलमान्वये कैलास बनसोडे, विठ्ठल चांदेकर, रविंद्र पवार आणि राजकुमार यांना प्रत्येकी१० वर्ष सक्तमजूरी, प्रत्येकी ५ लाख रुपये दंड, शिवाजी निमूर्ळे यास मोक्का कलमान्वये ७ वर्ष सक्तमजूरी, पाच लाख रुपये दंड, चौघांना मोक्काचेकलम ३ आणि ४ कलमान्वये ७ वर्ष सक्तमजूरी आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंड ठोठावला.