‘व्यंगचित्रातून भावना दुखावण्याचा हेतू नव्हता मात्र जर कोणा माता – भगिनीच्या भावना दुखावल्या असतील तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि सामना संपादक म्हणून त्यांची जाहीर माफी मागतो,’ असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
‘शिवाजी महाराज ज्या एकविरा देवीसमोर नतमस्तक व्हायचे, तीच आमचीही कुलदेवी आहे. स्वत: शिवसेनाप्रमुखही देवीसमोर लीन होत. त्याच बाळासाहेबांचा मी पुत्र आहे आणि शिवसैनिक त्याच भावाने स्त्रियांसमोर नतमस्तक होतात. जी व्यक्ती मता- भगिनींचा अपमान करेल, ती शिवसैनिक असूच शकत नाही. त्यामुळे या व्यंगचित्रावरून जी राळ उठवली गेली, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तो माझ्या जिव्हारी लागला आहे. सामनात छापून आलेले केवळ एक व्यंगचित्र होते, पण त्यावरून मोठा वाद निर्माण केला गेला. तरीही मी सर्व माता-भगिनींची जाहीर माफी मागतो’, असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
‘व्यंगचित्राच्या वादावरून उगाच राजीनाम्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. मात्र लोकांचा शिवसैनिकांवरील विश्वास कमी झालेला नाही. आम्हाला अनेकांनी हरवण्याचा, नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही सर्वांना पुरून उरलो, ‘ असे उद्धव म्हणाले.
‘मराठा आरक्षण विषयावर लवकरात लवकर एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं. सर्व नेत्यांना विधीमंडळात आपली भुमिका मांडायला लावा जेणेकरुन आपला शब्द फिरवून लोकांच्या भावनांशी खेळणार नाहीत,’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.