नवी मुंबईः सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या प्रस्तावांची आणि निर्णयांची अंमलबजावणी महापालिका प्रशासन करीत नसल्याने, प्रशासनाच्या या आडमुठे धोरणाचा निषेध म्हणून महापालिकेत पाय न ठेवण्याचा निर्धार महापौर सुधाकर सोनवणे यांनी केल्याने महापालिकेत सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये सुरु असलेला वाद विकोपाला गेला आहे. महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतलेल्या सदर भूमिकेवरुन नवी मुंबईच्या विकास कामांसंदर्भात आयुक्तांकडे विचारणा करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना आयुक्तांनी लोकप्रतिनिधींच्या राजकारणांवर बोलण्यास नकार दर्शवत महापालिकेत कोणी आले न आले तरी प्रशासनाची कोणतीही कामे थांबणार नाहीत, असे स्पष्ट केले. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट ‘लोकशाही’लाच आव्हान दिल्याची चर्चा नवी मुंबईत सुरु आहे. तुकाराम मुंढे यांनी ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे लावण्यात येणार्या मार्बलच्या आच्छादनाच्या कामाला यापूर्वीच विरोध दर्शवित सदर काम रद्द केले आहे. मार्बलचे आच्छादन लावण्याच्या कामाला सभागृहाने एकमुखाने मंजुरी दिली होती. तरी देखील सदर काम न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मध्ये निर्माण झालेला वाद अजुनही मिटत नसल्याचे दिसून येते. तोच घरगुती आणि वाणिज्य पाणी नळजोडणीवर एएमआर मीटर बसविण्याची सक्ती महापालिका प्रशासनाने केल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
बाजारात एएमआर प्रणालीचे पाणी मीटर उपलब्ध नसल्याने नागरिकांवर सक्ती करु नये, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी सभागृहात केली होती. त्यानुसार महापौर सुधाकर सोनवणे यांनी एएमआर (ऍटोमॅटीक मीटर रिडींग) मीटरची नागरिकांवर प्रशासनाने सक्ती करु नये, असे आदेश दिले होते. तरी देखील प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे. प्रशासनाला वेळोवेळी आदेश देवून देखील त्याची दखल न घेता प्रशासन आपले आडमुठी धोरण सोडण्यास तयार नाही. याचा निषेध म्हणून महापालिका मुख्यालयात पाय न ठेवण्याचा निर्णय महापौर सुधाकर सोनवणे यांनी जाहिर केला आहे.
महापौरांनी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात प्रशासनाची भूमिका काय असेल याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य मी करणार नाही असे सांगितले. लोकप्रतिनिधी नसले तरी, महापालिकेची कोणतेही विकास कामे थांबलेली नाहीत आणि थांबणारही नाहीत. यापुढेही विकास कामे होतच राहणार. प्रशासनाने आतापर्यंत लोकहिताचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यामुळे कोणा वाचूनही कामे थांबणार नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. एकंदरीतच आयुक्त तुकाराम मुंढे यांची भूमिका म्हणजे थेट ‘लोकशाही’लाच आव्हान देण्याचा प्रकार असल्याचे सत्ताधारी ‘राष्ट्रवादी’चे म्हणणे आहे.
एएमआर प्रणालीचे मीटर बसविण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला कॉंग्रेस पक्षाने देखील विरोध करीत महापौरांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे ‘कॉंग्रेस’चे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितले. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या भूमिकेशी आपण सहमत असून त्यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे ‘आरपीआय’चे जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी सांगितले. तर महापौरांची कोंडी करण्याचे काम सत्ताधारी ‘राष्ट्रवादी’ कडूनच होत असल्याने त्यांनी महापालिकेत पाय न ठेवण्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केला आहे.