श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई ः ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाव्दारे नागरिकांशी नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे थेट सुसंवाद साधत असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रम अंतर्गत येत्या ८ ऑक्टोबर २०१६ रोजी वाशी सेक्टर-२९ मधील राजीव गांधी उद्यानात महापालिका अधिकार्यांसह सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात महापालिका आयुक्तांकडे तक्रारी/सूचना/संकल्पना मांडण्याची इच्छा असणार्या नागरिकांनी त्या लेखी स्वरूपात आणून सकाळी ६ पासून तेथे उपस्थित असणार्या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा
आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रशासन आणि सभागृहातील लोकप्रतिनिधी यांच्यात वाद सुरू असले तरी सर्वसामान्य नवी मुंबईकरांचा आयुक्त मुंढे यांनाच पाठिंबा असल्याचे पहावयास मिळत आहे. भ्रष्टाचार, कामामागे मिळणारे कमिशन, पालिका निवडणूकीत अवघ्या ७ हजार ५०० रूपये मानधनासाठी करोडो रूपये खर्च करणारे हे घटक आपला खर्च झालेला पैसा भ्रष्टाचारातूनच वसूल करत असल्याचे नवी मुंबईकरांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छ व सुंदर नवी मुंबईसाठी परिश्रम करणारे मुंढे हे नगरसेवकांपेक्षा नवी मुंबईकरांना अधिक जवळचे वाटू लागले आहेत.