राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
नवी मुंबई आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात अनेक पायाभुत आणि दळणवळणाच्या सुविधांचे जाळे मतदार संघात निर्माण करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे रिंगरुट वाहतुक जाळे पूर्ण करणारा कासारवडवली-मिरा-भाईंदर-दहिसर या मेट्रो प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता द्यावी, अशी लेखी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस.मदान यांच्याकडे ३ ऑक्टोबर रोजी केली आहे. या महत्वपूर्ण मागणीबरोबरच सायन-पनवेल मार्गावर पडलेल्या खडडयांची दुरुस्ती करणे, कोपरखैरणे ते विक्रोळी उडडाणपूलाचे काम लवकरात लवकर सुरु करणे, वर्सोवा येथील वाहतुकोंडी फोडण्यासाठी या भागात मंजुर पूलाचे काम तत्परतेने सुरु करणे या महत्वाच्या विषयांकडे संबधीत प्राधिकरणांचे ३ ऑक्टोबर रोजी लेखी पत्र देवून लक्ष वेधले आहे. या सर्व मागण्यांच्या पुर्ततेसाठी डॉ.नाईक यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात देखील सातत्याने पाठपुरावा केला आहे.
कासारवडवली-मिरा-भाईंदर- दहिसर मेट्रो प्रकल्प…
वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्प ४चे काम लवकरात लवकर सुरु होणार आहे. त्याचबरोबर बांद्रा ते दहिसर या मेट्रो प्रकल्पाचे काम देखील सुरु झालेले आहे. त्यामुळे कासारवडवली पर्यंत येणारी मेट्रो पुढे तशीच घोडबंदर मार्गे मिरा-भाईंदर पालिका क्षेत्रापर्यत नेण्यात यावी तसेच दहिसर पर्यंत येणारी मेट्रो देखील मिरा-भाईंदर पालिका क्षेत्रापर्यंत आणण्यात यावी, अशी लेखी मागणी डॉ. नाईक यांनी केली आहे. या विस्तारित मेट्रो प्रकल्पामुळे एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे रिंगरुट वाहतुकीचे जाळे पूर्ण होईल, आणि मिरा-भाईंदरकरांना देखील मेट्रोची सेवा मिळेल, असे डॉ.नाईक यांनी सांगितले. मिरा-भाईंदरच्या नगरसेविका दक्षता ठाकुर आणि इतर लोकप्रतिनिधींनी डॉ.नाईक यांना या मेट्रो प्रकल्पाविषयी विनंती केली होती.
कोपरखैरणे-विक्रोळी खाडी पुलाला गती देणे…
नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा कोपरखैरणे महापे पुल ते कन्नमवार विक्रोळी हा खाडीपुल लवकरात लवकर सुरु व्हावा, यासाठी डॉ.नाईक सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. ऐरोली विधानसभेचे आमदार संदिप नाईक यांनी देखील या खाडीपुलाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी मंत्रालयीन स्तरावर पत्रव्यवहार केला असून या संदर्भात विधानसभेत देखील विषय उपस्थित केला होता. या खाडीपुलामुळे नवी मुंबईतून मुंबईत आणि मुंबईतून नवी मुंबईत कमी वेळात येणे-जाणे शक्य होणार आहे. या खाडीपुलाला केंद्रीय आणि राज्य स्तरावर मान्यता मिळूनही पुलाचे काम अद्याप सुरु झालेले नाही. त्या संबधीचा आढावा घेवून हे काम त्वरीत सुरु करावे, अशी मागणी डॉ.नाईक यांनी एमएमआरडीएचे आयुक्त मदान यांच्याकडे केली आहे. या पुलामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांना नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमातळ आणि मुंबईतील अस्तित्वातील विमानतळांकडे जाणे सोपे होणार आहे.
सायन-पनवेल रस्ता तातडीने दुरुस्त करावा..
सायन-पनवेल मार्गाची झालेली दुर्दशा आणि त्यावर पडलेल्या अनेक खडडयांमुळे वाहनचालक आणि नागरिकांना होणार्या प्रचंड त्रासाकडे डॉ.नाईक यांनी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय-संचालक आर.एस. मोपलवार यांना लेखी पत्र लिहून लक्ष वेधले आहे. या मार्गावरील वाशी टोलनाका ते सीबीडी-बेलापूर या नवी मुंबई शहराच्या हददीत असलेल्या रस्त्यावर आणि उडडाणपूलांवर अनेक ठिकाणी खडडे पडले आहेत. या मार्गावर खडडयांमुळे वाहतुककोंडी होत असते. तसेच भरधाव वाहनांना अपघातही घडतात. वेळोवेळी सुचित करुनही रस्त्याची देखभाल करणारे अधिकारी आणि ठेकेदार या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असून त्याविरोधात जनतेमध्ये संतापाची भावना आहे. त्याची दखल घेवून सायन-पनवेल रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी डॉ.नाईक यांनी व्यवस्थापकीय-संचालक मोपलवार यांच्याकडे केली आहे.
वर्सोवातील मंजुर नविन पुलाचे काम सुरु करावे
घोडबंदर परिसरातील वर्सोवाच्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह ठाणे शहरात मोठया प्रमाणावर सध्या वाहतुककोंडी होते आहे. या पुलाची दुरुस्ती अतिशय संथ गतीने सुरु असून त्यामुळे निर्माण होणार्या वाहतुककोंडीत वाहने अक्षरशः तासनतास अडकून पडतात. मागील वर्षी देखील पुलाच्या दुरुस्तीमुळे अशीच स्थिती ओढावली होती. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर या ठिकाणी मंंजुर केलेल्या पुलाचे काम हाती घ्यावे, अशी सुचना डॉ.नाईक यांनी केंद्रीय वाहतुकमंत्री नितिन गडकरी आणि या खात्याचे केंद्रीय सचिव संजय मित्रा यांच्याकडे केली आहे. जुन्या पुलाच्या दुरुस्तीला गती देवून नविन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर हाती घेतले तर येथील वाहतुक कोंडीवर कायमचा तोडगा निघेल, असा विश्वासही डॉ. नाईक यांनी व्यक्त केला आहे.