* फक्त आस्थापेवरील बदल्या व अधिकार्यांना शिक्षेचा धाक एवढेच काम केले
* राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेच्या काही नगरसेवकांचा महापौर सुधाकर सोनवणेंना पाठिंबा
* महासभेच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यत महापालिकेत पाय न ठेवण्याच्या भूमिकेवर महापौर सोनवणे ठाम
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या पाच महिन्यात केलेले कोणतेही एक लोकोपयोगी काम दाखवावे, असे आव्हान नगरसेवकांनी दिले आहे. फक्त महापालिका आस्थापनेवरील बदल्या आणि अधिकार्यांना शिक्षेचा धाक दाखविण्याव्यतिरिक्त कोणतेच काम महापालिका आयुक्त करीत नाहीत, अशी सडेतोड भूमिका महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतली आहे. या भूमिकेनंतर महापौर सुधाकर सोनवणे एकटे पडले असताना आता उशिरा ‘राष्ट्रवादी’चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नगरसेवक अनंत सुतार यांनी ‘राष्ट्रवादी’चा महापौर सुधाकर सोनवणे यांना पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर केली आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे मनमानी कारभार करत आहेत, असा आरोप करत ‘नवी मुंबई’चे महापौर सुधाकर सोनवणे यांनी, ‘जोपर्यंत महापालिका प्रशासनाची मनमानी थांबत नाही तोपर्यंत महापालिका मुख्यालयात पाय ठेवणार नाही’, असे नुकतेच घोषित केले होते. महापालिका प्रशासनाच्या विरोधात महापालिका मुख्यालय बहिष्कार अस्त्र उपसल्यानंतर आता ‘महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्याचा अधिकार महापौरांना असतो या अधिकाराने आता सर्वसाधारण सभा घेणार नाही’, अशी घोषणा अचानक महापौर सुधाकर सोनवणे यांनी केल्याने नवी मुंबई शहरातील अनेक विकासकामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या या भूमिकेला महापालिकेतील सत्ताधारी ‘राष्ट्रवादी’ने देखील तडकाफडकी पाठींबा घोषित केल्याने महापौर विरुध्द आयुक्त वाद आणखी चिघळला आहे.
महापालिका हद्दीतील रहिवाशी नळजोडणीधारकांना एएमआर मीटर बसविणे बंधनकारक करण्यावरुन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर सुधाकर सोनवणे यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. यापूर्वी महापालिका आयुक्तांच्या विरोधात महापालिकेत कामे होणार नसतील तर महापालिकेत कशाला जायचे?, अशी भूमिका घेवून महापौर सुधाकर सोनवणे यांनी यांनी आपली नाराजी जाहीर केली होती. आता थेट सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घालण्याची घोषणा महापौर सुधाकर सोनवणे यांनी केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी महापौर सुधाकर सोनवणे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेत देखील सर्व आलबेल नसल्याचे निदर्शनास आले आहे.
महासभेने घेतलेल्या विविध निर्णयांची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महापालिकेत पाय ठेवणार नाही, अशी भूमिका महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतली आहे. महापौर नाराज आहेत, राजीनामा देणार अशा बातम्या येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि ‘राष्ट्रवादी’चे नेते गणेश नाईक यांच्यासह ‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक महापौर सुधाकर सोनवणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. ‘राष्ट्रवादी’चा विरोध कुठल्याही व्यक्तीला नाही. कायद्याप्रमाणे वागलात तर पाठींबा आणि चुकीचे कामकाज कराल तर त्याला पूर्णपणे विरोध, अशी ‘राष्ट्रवादी’ची स्पष्ट भूमिका आहे. महापौर सुधाकर सोनवणे त्यांचा कार्यकाळ पूर्णपणे पार पाडतील असा मला विश्वास आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नगरसेवक अनंत सुतार यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, महापौर सुधाकर सोनवणे यांनी निराश होऊन राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केल्यावर ‘राष्ट्रवादी ’ने अखेर महापौर सुधाकर सोनवणे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.