नवी मुंबई ः घणसोली सेक्टर-७ मधील माऊली कृपा को. ऑप. हौसिंग सोसायटी मधील पॅसेजमध्ये लावण्यात आलेल्या अनधिकृत लोखंडी दरवाजांमुळे सोसायटीमधील रहिवाशांना नाहक त्रास होत असल्याने सदर लोखंडी दरवाजे महापालिका प्रशासनाने काढून टाकावेत, अशी मागणी माऊली कृपा हौसिंग सोसायटी मधील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मारुती वाघमारे यांनी थेट नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे.
माऊली कृपा हौसिंग सोसायटी मधील बेकायदा लोखंडी दरवाजाबाबत प्रथमच महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्याने याप्रकरणी महापालिका आयुक्त कायकारवाई करतात, याकडे सोसायटीमधील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
२००४ सालापासून घणसोली सेक्टर-७ मध्ये माथाडी कॉम्पलेक्स (सिम्पलेक्स) उभारण्यात आले. सिप्ललेक्स मधील माऊली कृपा सोसायटीतील डी १ ते ५ बिल्डिंग मधील पॅसेज मध्ये व्यक्तिरीत्या पैसे काढून लोखंडी दरवाजे बसविण्यात आले. परंतु,या दरवाजांचा काहीएक उपयोग होत नसून उलट लोकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे सोसायटी मार्फत सदर लोखंडी दरवाजे काढण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघमारे यांनी ‘माऊली कृपा हौसिंग सोसायटी’चे अध्यक्ष/ सचिव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, या मागणीची ‘सोयायटी’चे अध्यक्ष/ सचिव यांनी दखल न घेतल्याने चंद्रकांत वाघमारे यांनी माऊली कृपा सोसायटीमधील अनधिकृत लोखंडी दरवाजाबाबत सिडको वसाहत अधिकारी, सहाय्यक निबंधक संस्था आणि महापालिका घणसोली विभाग सहाय्यक आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार १५ जुलै रोजी केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन सिडको वसाहत अधिकार्यांनी ‘माऊली कृपा सोसायटीमध्ये बसविण्यात आलेले लोखंडी दरवाजे सोसायटीची अंतर्गत बाब आहे. याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सोसायटीने घ्यायचा आहे. याप्रकरणी सिडको प्रशासनास काहीही कारवाई करता येणार नाही,’ असे चंद्रकांत वाघमारे यांना लेखी स्वरुपात कळविले आहे. शिवाय दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.
चंद्रकांत वाघमारे यांच्या तक्रारीनंतर, ‘माऊली कृपा सोसायटीमधील इमारत क्रमांक- डी १ ते डी ५ या पॅसेजमध्ये वैयक्तिक पैसे काढून, बेकायदा लोखंडी दरवाजे बसविल्यामुळे रहिवाशांना जाणे-येण्यास त्रास होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. सदरच्या तक्रारीकडे सोसायटी पदाधिकार्यांनी सुद्धा दुर्लक्ष केल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे आपण सोसायटीचे अध्यक्ष/सचिव या नात्याने तात्काळ बेकायदा लोखंडी दरवाजांवर कार्यवाही करुन, तसा अहवाल या कार्यालयास ७ दिवसांमध्ये सादर करावा, अन्यथा आपणांविरुद्ध कार्यवाही करणेत येईल’, अशी तंबी महापालिका घणसोली विभाग सहाय्यक आयुक्तांनी २१ जुलै २०१६ रोजीच्या पत्राद्वारे ‘सोसायटी’चे अध्यक्ष/सचिव यांना दिली होती.
मात्र, या तंबीचा ‘सोसायटी’चे अध्यक्ष/सचिव यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. याशिवाय महापालिका घणसोली विभाग सहाय्यक आयुक्तांनी देखील बेकायदा लोखंडी दरवाजे न काढल्याबद्दल ‘सोसायटी’चे अध्यक्ष/सचिव यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे अखेर चंद्रकांत वाघमारे यांनी लोकांना त्रासदायक ठरणारे ‘माऊली कृपा सोसायटी’मधील बेकायदा लोखंडी दरवाजे हटविण्यासाठी आता थेट महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली आहे.
‘माऊली कृपा सोसायटी’मधील बेकायदा लोखंडी दरवाजे हटविण्यासाठी घणसोली विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्याकडे १५ जुलै रोजी तक्रार अर्ज सादर केला होता. परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. वारंवार तक्रारी बाबत विचारणा केली असता, ‘पोलीस बंदोबस्त उपलब्ध नाही’ असे कारण देऊन आपल्या वरील जबाबदारी सहाय्यक आयुक्त दिवाकर समेळ झटकत आहेत. रहिवाशांच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन बेजबाबदार अधिकार्यावर कठोर कार्यवाही करुन त्यांना निलंबीत करण्यात यावे आणि माऊली कृपा सोसायटीमधील रहिवाशांना होत असलेल्या लोखंडी दरवाजाचा नाहक त्रास लक्षात घेऊन पॅसेजमध्ये बसविण्यात आलेले लोखंडी दरवाजे काढावेत, असे चंद्रकांत वाघमारे यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.