श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई ः दिवाळी सणानिमित्त अधिकारी कर्मचार्यांना सानुग्रह अनुदानापोटी द्यावयाच्या रक्कमेवर स्थायी समितीची मंजुरी घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावात वाढ करत स्थायी समितीने कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचार्यांना १५ हजार ऐवजी १६ हजार रुपये तसेच करार पध्दत आणि ठोक पगारावरील कामगारांना ८ हजार ऐवजी साडे आठ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ‘नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन’ने या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेतील ‘म्युनिसिपल मजदूर युनियन’ने २१ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिवाळी सणापूर्वी देण्याची मागणी केली होती. स्थायी समितीमध्ये महापालिकेतील कायमस्वरूपी अधिकारी-कर्मचारी वर्गाला तसेच कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. महापालिकेतील ३००२ कायमस्वरूपी आणि ७९७ कंत्राटी कामगार अशा एकूण ३७९९ कर्मचार्यांना सदर सानुग्रह अनुदानाचा लाभ होणार आहे. सानुग्रह अनुदानासाठी चालू अर्थसंकल्पात ६ कोटी ५५ लाख ६० हजार इतकी तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या सानुग्रह अनुदानाच्या रक्कमेत सर्वसाधारण सभा आपल्या अधिकारात निश्चित वाढ करेल, असा विश्वास ‘नवी मुंबई म्युनिसिपल मजूदर युनियन’चे कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
इंटक मात्र निर्णयावर असमाधानी
महापालिका प्रशासनात झालेल्या सानुग्रह अनुदानाच्या निर्णयावर इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. समान कामाला समान वेतन असा नारा देणारी महापालिका सानुग्रह अनुदानाबाबत दुजाभाव का करत आहे. महापालिका आर्थिकदृष्ट्या भक्कम असल्याने कंत्राटी व कायम दोन्ही वर्गातील कामगारांना सरसकटपणे १८ ते २० हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.