खिशात लाखोंनी पैसा असताना, सभोवताली कार्यकर्त्यांचा गराडा असतानाही एक माणूस राजकारणात गेली अनेक वर्षे राहूनही कोणतेही पद न घेता केवळ समाजकारणाचे व्यसन कसे जोपासू शकतो, याचे कोणाला उत्तर हवे असेल तर त्यांना शिरवणे गावातील समाजसेवक, कट्टर शिवसैनिक आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून गणल्या जाणार्या अविनाश सुतार यांच्याकडेच पहावे लागेल.
गेली अनेक वर्षे अविनाश सुतार कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेच्या प्रवाहात सक्रिय आहेत. केवळ शिरवणेच नाही तर नवी मुंबई त्यांना अवीशेठ या नावाने ओळखते. अविशेठ म्हणजेच जिंदादिल माणूस. खिशात पैसा असतानाही जमिनीवर पाय ठेवून सर्वसामान्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये वावरणारा एक हाडामासाचा सच्चा समाजसेवक. या माणसाला कधी आपल्या पैशाचा, राजकीय वर्तुळाचा अथवा आपल्या सभोवताली असणार्या मित्रपरिवाराचा, कार्यकर्त्यांचा गर्व वाटत नाही. त्यामुळेच अवीशेठशी संपर्क करताना, अविशेठशी सुसंवाद साधताना कोणालाही संकोच वाटत नाही. उलटपक्षी आपल्या घरातीलच एका सदस्याशी अथवा जवळच्या मित्राशीच आपण संभाषण करत आहोत असा भास होतो. 26 ऑक्टोबर हा अविशेठचा जन्मदिवस. अविशेठला वाढदिवसानिमित्त मनापासून अभिष्ठचिंतन करताना अविशेठच्या स्वभावगुणांचा उल्लेख न करणे म्हणजेच अविशेठच्या आजवरच्या वाटचालीवर अन्याय करण्यासारखेच ठरेल.
शिरवणे गावातून नवी मुंबई महापालिका स्थापनेनंतर तब्बल 15 वर्षानंतर प्रथमच ज्ञानेश्वर सुतारांच्या माध्यमातून शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला. सुरूवातीला शिवसेनेच्या तिकीटावर शिरवणे गावातून गावाचे दादूस अर्थात जयवंत सुतार विजयी झाले होते. दादूसांची बोनकोडेकरांवर बेफाम प्रेम व अफाट श्रध्दा असल्याने गणेश नाईकांसोबत जयवंत सुतारांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. तेव्हापासून जयवंत सुतार अर्थात दादूस बोले अन् शिरवणे गाव डोले असे शिरवणे गावाचे राजकीय समीकरण होते. पण महानगरपालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूक शिरवणे गावात राजकीय भूकंप झाला. तब्बल 15 वर्षानंतर ज्ञानेश्वर सुतारांच्या माध्यमातून शिरवणे गावात शिवसेनेने विजयी मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभेद्य गडाला धडक देत शिवसेनेचा भगवा फडकला. अर्थात यामागे केवळ आणि केवळ अविनाश सुतार या एकमेव माणसाचे परिश्रम, जनसंपर्क आणि साधी रहाणी, प्रेमळ वाणी याचा सिंहाचा वाटा होता, हे कोणीही नाकारणार नाही.
नवी मुंबईतील एक प्रख्यात बांधकाम व्यावसायिक, क्रिकेट खेळावर बेफाम जीवापाड प्रेम करणारा क्रिकेटवेडा, दानधर्म करताना कधीही हात आखडता न घेणारा एक धार्मिक माणूस, कट्टर शिवसैनिक, साधा भोळा माणूस अशा विविध रूपात अवीशेठ आजही वावरत आहेत. या माणसाला दिवसाउजेडी अथवा रात्री-अपरात्री कधीही भेटा, संभाषणात तोच गोडवा आणि आपलेपणाचा ओलावा अनुभवयास मिळेल. शिवसेना संघटनेत अनेक वर्षे केवळ शिवसैनिक पदावर कार्यरत राहून सामाजिक कार्य करण्यातच अवीशेठला धन्यता वाटते. शिवसेनेच्या माध्यमातून अवीशेठ शिरवणे गाव व सभोवतालच्या परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. स्थानिक भागातील रहीवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकरता आणि नागरी समस्यांचे निवारण करण्याकरता पाठपुरावा करत असतात. अविशेठ नावाचे एक अजब रसायन शिरवणेच्या मातीत जन्माला आले आहे. माणसाचा साधेपणा व विनम्रता अवीशेठच्या नसानसात भिनलेली आहे. या माणसाला उदंड व निरोगी आयुष्य लाभणे समाजासाठी आवश्यक आहे. एकवीरा आई व सारसोळेच्या खाडीअंर्तगत भागात असणारा बामणदेव व विघ्नहर्ता गणराया नक्कीच अवीशेठच्या आगामी वाटचालीला आशिर्वाद देणार याची आम्हाला खात्री आहे. समाजहितासाठी अवीशेठ तुम्ही शतायुषी व्हा!
– श्रीकांत पिंगळे
कार्यकारी संपादक
नवी मुंबई लाईव्ह.कॉम