मनसे नवी मुंबई जनमत चाचणी घेणार
नवी मुंबई : आज नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यक्षम आयुक्त तुकाराम मुंढे विरोधात नगरसेवकांनी जो अविश्वास ठराव मंजूर केला हा अविश्वास ठराव नसून, सर्वसामन्य नवी मुंबईकरांचा विश्वासघात असल्याचे मत मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केले. आज ज्या पक्षांच्या नगरसेवकांनी आयुक्तांविरोधात अविश्वास ठरावाला मंजुरी दिली त्यापैकी बऱ्याच नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे ACB कडे आयुक्तांनी पाठवली असून या एकाच भीतीपोटी या नगरसेवकांनी आयुक्तांच्या विरोधात आज मतदान केले असा आरोप मनसेचे सविनय म्हात्रे यांनी केला आहे.
एका कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात धडक मोहीम उघडलेल्या नवी मुंबईच्या आयुक्तांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात आज अविश्वास ठराव मंजूर होणे म्हणजे एक प्रकारे लोकप्रतिनिधींनी लोकशाहीचा गळा घोटल्याचे मत नवी मुंबई शहर सचिव अॅड.कौस्तुभ मोरे यांनी व्यक्त केले आहे.
महापालिकेतील मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काही दिवसांत नवी मुंबई मध्ये विविध माध्यमांतून सर्व सामान्य नवी मुंबईकरांची जनमत चाचणी घेणार असे नवी मुंबई शहर सचिव संदीप गलुगडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सदरचा अविश्वास ठराव परतवून लावावा आणि कर्तव्यदक्ष आणि प्रमाणिक आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे अशी मागणी देखील मनसेने याप्रसंगी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील अविश्वास ठरावाचा आजचा दिवस म्हणजे नवी मुंबईकरांसाठी काळा दिवस असल्याचे मत शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केले आहे.