श्रीकांत पिंगळे
नगरसेविका सुजाता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई : महापालिका सभागृहातील नगरसेवक विकास कामे होत नसल्याचा टाहो फोडत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग 85च्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे दिवाळी पाडव्याच्या मूहूर्तावर सोमवारी, दि. 31 ऑक्टोबर रोजी विकासकामांचा शुभारंभ होत आहे. पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून, समस्यांचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांना दाखविल्यामुळे प्रभाग 85 मध्ये विकासपर्वाचा अश्व अडविणे कोणालाही शक्य होणार नसल्याचे खुद्द पालिका अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे.
प्रभाग 85 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील तर शेजारच्या प्रभाग 86 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर आहेत. त्यामुळे दोन्ही प्रभागातील विकासकामांचा शुभारंभ एकत्रितरित्या नेरूळ सेक्टर 6 मध्ये भाजी मार्केटच्या मैदानावर सकाळी 11 वाजता होणार आहे. ज्यांनी प्रभागाला जवळूल पाहिले आहे. प्रभागातील समस्या व सुविधांबाबत जागृत आहे. प्रभागातील अशाच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग 86चे अध्यक्ष महादेव पवार आणि यशवंतमामा तांडेल यांनी दिली.
तानाजी मालुसरे मैदान सेक्टर 6मधील सार्वजनिक शौचालयाचे नुतनीकरण, सारसोळे गाव बेकरीजवळील सार्वजनिक शौचालयाचे नुतनीकरण, सारसोळे गाव पामबीच मार्गालगत सार्वजनिक शौचालयाचे नुतनीकरण, सारसोळे गाव विहिरीजवळील सार्वजनिक शौचालयाचे नुतनीकरण, सारसोळे गाव मासळी मार्केटजवळील सार्वजनिक शौचालयाचे नुतनीकरण, सप्तशृंगी इमारत ते महापालिका शौचालयापर्यत आरसीसी गटाराचे बांधकाम, भुखंड क्रंमाक 114 वरील माधवीला इमारत ते भुखंड क्रमांक 265/280 आणि शिवाजी मढवी यांच्या घराजवळील गटारांची सुधारणा करणे या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग 85 चे अध्यक्ष तुकाराम टाव्हरे यांनी दिली.
हागणदारी मुक्त नवी मुंबईसाठी पालिका प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु पालिकेचीच सार्वजनिक शौचालये सुस्थितीत नसतील तर या अभियानाला मर्यादा पडतील. त्यामुळेच सर्वप्रथम प्रभागातील शौचालयाची डागडूजी हाती घेवून बकालपणा व दुर्गंधी संपुष्ठात आणण्याकरता प्राधान्य दिले असल्याची माहिती नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी दिली.
नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील या प्रभागातील समस्यांबाबत व असुविधांबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून प्रभागातील पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या कृत्रिम पाणी टंचाईवर काही दिवसापूर्वीच्या महासभेत सभागृहाचे लक्ष वेधले होते. महापौर सुधाकर सोनावणे हे सुजाता पाटील यांना बोलण्यास परवानगी देत नसल्याचे पाहून प्रभागातील नागरिकांच्या समस्यांना सभागृहात वाचा फोडण्यासाठी महापौरांना खडे बोल सुजाता पाटील यांनी सुनावल्याचे नवी मुंबईकरांनी पाहिले आहे.