श्रीकांत पिंगळे
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई : बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचे सकारात्मक प्रयत्न आणि त्यांनी राज्य शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मागील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला कुकशेत ग्रामस्थांचा प्रश्न निकाली लागला आहे. आज 14 मूळ मालकांना आपल्या मालकी हक्कांचे करारपत्र आमदार मंदाताई म्हात्रे आणि एम.आय.डी.सी. चे प्रादेशिक अधिकारी पंकज देवरे यांच्या संयुक्त हस्ते देऊन अनोखी दिवाळी भेट देण्यात आली.
शिरवणे एम.आय.डी.सी. मधील हार्डीलिया कंपनीच्या लगत असणा-या कुकशेत गावाचे स्थलांतरण 1995 साली नेरूळ येथील सेक्टर 12 येथे करण्यात आले. परंतु, स्थलांतर झाल्यापासून ते आजतागायत कुकशेतवासीयांवर अतिक्रमणाची टांगती तलवार सातत्याने होती. तेथील स्थलांतरित प्रकल्पग्रस्तांना पूर्वीच्या कुकशेतगावच्या मूळ जागेच्या प्रमाणात जागा मिळणे अपेक्षित असताना, केवळ 80 व 100 स्क्वेअर मीटरचे भूखंड एम.आय.डी.सी.मार्फत देण्यात आले होते. हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच होता.
कुकशेतमधील नागरिकांच्या राहत्या भूखंडाचे कागदपत्र नसल्याने नकाशा मंजुरीला अडथळा निर्माण होत होता. परिणामी, नव्याने घर बांधण्यासाठी घराची पुनर्बांधणी करण्याकरिता आर्थिक मंजुरी देण्यास वित्तीय संस्था धजावत असत. मागील 20 वर्षांपासून मालकी हक्काच्या करारपत्राचा विषय राज्य शासन दरबारी प्रलंबित होता. बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे विधानसभेवर निवडून गेल्यापासून त्यांनी ह्या प्रलंबित प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून कुकशेतमधील 284 कुटुंबीय प्रकल्पग्रस्तांना मालकी हक्काचे करारपत्र प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यापैकी, 14 कुटुंबीयांना मालकी हक्काचे करारपत्र आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते आज नवी मुंबई महापे येथील एम.आय.डी.सी. कार्यालयात वितरीत करण्यात आले. सदर करार कालावधी हा 99 वर्षांसाठी आहे. या करारासाठी शासनाकडून प्रत्येक भूखंडामागे (प्रती 100 स्क्वे. मी.) आकारण्यात येणारा मुद्रांक शुल्क तब्बल पाच लाख रुपये आणि नोंदणी खर्च तीस हजार अशी एकूण पाच लाख तीस हजार रुपयांची रक्कम शासनाने भरली आहे.
याप्रसंगी एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी पंकज देवरे, व्यवस्थापक श्री. शिंपे, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मारुती भोईर, संपत शेवाळे, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, नगरसेवक सुनील पाटील, उज्वला झंजाड, दीपक पवार, कृष्णा पाटील, गोपाल गायकवाड, विक्रम पराजुली, बाळासाहेब बोरकर तसेच शेकडो प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
—————————————————————————————–
कुकशेत ग्रामस्थांना आपल्या घरांचा मालकी हक्क नसल्याने या घरांची पुनर्बांधणी किंवा समूह विकास ग्रामस्थ करू शकत नव्हते, परिणामी त्यांचा विकास खुंटला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन महसूल मंत्री एकनाथजी खडसे यांच्यामुळेच हा आर्थिक तिढा सुटल्याने ख-या अर्थाने कुकशेतवासियांना दिलासा मिळून दिवाळी भेट प्राप्त झाली आहे. -आमदार मंदाताई म्हात्रे (नवी मुंबई)