* भ्र्रष्टाचाराचा दिंडोरा पिटणारे आयुक्त मुंढे पडले तोंडघशी
* मालमत्ता कर विभागात भ्रष्टाचार नव्हे १९०० कोटींची थकबाकी
नवी मुंबई ः महापालिकेच्या मालमत्ता कर विभागात १ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करणार्या प्रशासनाने अखेर घुमजाव करीत भ्रष्टाचार नव्हे तर सुमारे १९०० कोटींची थकबाकी असल्याचे म्हटले आहे. यामुळे भ्रष्टाचाराचा दिंडोरा पिटणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे तोंडघशी पडले आहेत. स्थायी समितीच्या ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या साप्ताहिक बैठकीत पटलावरचे कामकाज संपल्यानंतर ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नगरसेवक तथा सभागृह नेते जयवंत सुतार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत गेल्या महिन्यात महापालिकेच्या मालमत्ता विभागात एक लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याचे वृत्त वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द झाले आहे. सदरची बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्याबाबत स्थायी समिती सदस्यांपुढे खुलासा करावा, अशी मागणी जयवंत सुतार यांनी केली. त्यावर स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत, असे सांगितले.
चौकशी करण्यास किंवा गुन्हे दाखल करण्यास महापालिका प्रशासनाला कोणाही पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी रोखलेले नाही. भ्रष्टाचार झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले त्यावेळी त्याची माहिती स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेपुढे का ठेवली नाही. परस्पर वृत्तपत्रांना माहिती देवून लोकप्रतिनिधींचा तर अपमान केलाच; परंतु महापालिकेची बदनामी प्रशासनाने केली आहे. गेल्या सहा महिन्यात शहरात कोणती चांगली कामे प्रशासनाने केलीत किंवा कोणते चांगले निर्णय घेतले ते देखील स्थायी समितीपुढे प्रशासनाने सांगावे असे सांगत सहा महिन्यात फक्त महापालिकेची आणि लोकप्रतिनिधींची बदनामी करण्याचे काम प्रशासनाने केले असल्याचा आरोप सभापती शिवराम पाटील यांनी यावेळी केला.
मालमत्ता कर विभागातील कथित भ्रष्टाचारासंदर्भात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त उमेश वाघ यांनी मालमत्ता कर विभागात भ्रष्टाचार झाला असल्याची बाब या विभागाकडून सांगण्यात आलेली नाही. फक्त अनेक वर्षापासून सुमारे ३३०० मालमत्ता करांची बिले ग्राहकांना देण्यात आलेली नव्हती. त्या बिलापोटी हजार कोटी रुपये महापालिकेचा मालमत्ता कर थकीत राहिला. त्याच्यावरील व्याज सुमारे ९०० कोटी रुपये पर्यंत आहे. असे एकूण १९०० कोटी रुपये माल मत्ता करांची थकीत बिले ग्राहकांना देण्यात आलेली आहेत. त्यातून महापालिकेचा थकीत कर वसूल होऊन उत्पन्नात वाढ होईल, असे वाघ यांनी सांगितले. तसेच पुढील स्थायी समितीच्या बैठकीत थकीत मालमत्ता करासंदर्भात सर्व माहिती आणि कागदपत्रे सदस्यांपुढे सादर करण्यात येतील, असेही उमेश वाघ यावेळी म्हणाले.
मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्तांच्या कथित भ्रष्टाचारा बाबतच्या सदर उत्तरानंतर शिवसेनेचे सदस्य एम. के. मढवी, राष्ट्रवादीचे अशोक गुरखे आणि सभापती शिवराम पाटील यांनी प्रशासनाने मालमत्ता कर विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आव आणत महापालिकेची बदनामी करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचे सांगत प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसात तुकाराम मुंढे यांनी मालमत्ता कर विभागात भ्रष्टाचार झाल्याचे जाहिर करीत मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त प्रकाश कुलकर्णी यांना सेवेतून निलंबित करुन त्यांना विभागीय आणि एसीबी चौकशीच्या फेर्यात अडकवले. गेल्या सहा महिन्यात मालमत्ता कर विभागात कोणताही भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले नाही. तसेच आयुक्त मुंढे मालमत्ता कर विभागातील भ्रष्टाचार सिध्द करु शकले नाहीत. सहा महिन्यानंतर मालमत्ता कर विभागाची जबाबदारी सांभाळणार्या उमेश वाघ यांनी अखेर तुकाराम मुंढे यांच्या आरोपावर पांघरुन टाकत मालमत्ता कर विभागात भ्रष्टाचार नव्हे तर १९०० कोटींची थकबाकी असल्याचे सांगत घुमजाव केला आहे. यामुळे नवी मुंबई महापालिका आणि येथील लोकप्रतिनिधी यांनी भ्रष्टाचार केल्याचा ढिंडोरा पिटत त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणारे महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे अखेर तोंडघशी पडले आहेत.