श्रीकांत पिंगळे
* सारसोळेतील सामाजिक कार्यकर्ते मनोज मेहेर यांचे महापालिका प्रशासनाला साकडे
नवी मुंबई : प्रभाग 86 मध्ये सुरू असलेल्या गटारांच्या कामाची व सार्वजनिक शौचालयांच्या कामाची तपासणी करून बांधकाम गुणवत्ता चाचपणी करण्याची लेखी मागणी सारसोळे गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोज मेहेर यांनी पालिकेच्या नेरूळ विभाग अधिकार्यांकडे केली आहे.
सर्वप्रथम खूप वर्षानंतर प्रभाग 86 मधील सारसोळे गावामध्ये व नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिका प्रशासनाने गटारांची व सार्वजनिक शौचालयांची जी कामे सुरू केली आहेत, त्याबाबत सर्वप्रथम महापालिका प्रशासनाचे सारसोळे गावच्या ग्रामस्थांकडून आणि नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांकडून मनोज मेहेर यांनी आभार मानले आहेत.
सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात पालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या गटारांच्या व सार्वजनिक शौचालयांच्या कामाबाबत मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. गटारांची कामे सुरू असताना तळापासून कामे केली जात नसून फक्त गटारांच्या वरवर स्लॅप टाकले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गटारांची तळापासून कामे होणे आवश्यक आहे. केवळ वरवर स्लॅप न टाकता दोन्ही बाजूने सिमेंटचे कठडेच्या धर्तीवर काम करून त्यावर स्लॅप टाकणे आवश्यक आहे. जेणेकडून कामाला मजबूती प्राप्त होवून काम अनेक काळ टिकावू राहील. सार्वजनिक शौचालय व गटारांच्या कामामध्ये पालिकेने निविदेच्या कामामध्ये ज्या ज्या कामाचा उल्लेख केला आहे, ती कामे पूर्णपणे झाली आहेत अथवा वरवर थुंकपट्टी करण्यात आली आहे, याची आपल्या विभागाकडून वरचेवर पाहणी करण्यात यावी. कामात काही सदोषपणा आढळून आल्यास ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचे देयक देण्यात येवू नये. कामाची गुणवत्ता चाचपणी करूनच ठेकेदाराला देयक देण्यात यावे. निविदेप्रमाणे कामे झाली पाहिजेत व करदात्या नागरिकांचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे, हीच एकमेव आमची प्रामाणिक भावना असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
मागणीचे गांभीर्य लक्षात घेवून गटारांच्या व सार्वजनिक शौचालयांच्या सुरू असलेल्या कामाची वरचेवर पाहणी करून निविदेत उल्लेख केल्याप्रमाणे कामे होत आहेत अथवा नाही याची संबंधित विभागाकडून खातरजमा करून घेण्याची मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.