*** भाऊ चा धक्का ते मांडवा ते नेरुळ दरम्यान रो रो प्रवासी सेवा
नवी मुंबई : वेगाने विकसीत होणार्या नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण पाहता आमदार संदीप नाईक हे या भागातून मुंबईकरीता जलवाहतूक सुरु व्हावी यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून भाऊचा धक्का ते मांडवा ते नेरुळ दरम्यान रो रो प्रवासी सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच जाहिर केले असून त्या अनुशंगाने कामासही सुरुवात झाली आहे. मार्च २०१८पूर्वीे हे सेवा सुरु होईल,असे सरकारतर्फे जाहिर करण्यात आले आहे.
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जुलै २०१६मध्ये आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडिया अशी जल वाहतुकसेवा सुरु करण्याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या शहरातील वाहतुककोंडी वाढणार आहे. रस्ते आणि रेल्वे सेवेवरील ताण अगोदरच जास्त आहे. नवी मुंबईतून मुंबईत आणि मुंबईतून नवी मुंबईत दररोज रस्ते आणि रेल्वे मार्गे प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे या प्रवाशांना पर्यावरणपूरक, स्वस्त आणि जलद असा जल वाहतुकीचा तिसरा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, या मागणीच्या पुर्ततेसाठी आमदार नाईक आग्रही होते. नवी मुंबई ते नेरुळ ते भाउचा धक्का अशी जल प्रवासी वाहतूक सुरु करावी. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, ऐरोली, कळवा, भिवंडी, भाईंदर या भागांना देखील या जलमार्गाने जोडावे, अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी केली होती.
सागर किनार्यावरील जेट्टींच्या विकासातून जलवाहतूक …
नवी मुंबईतील सागरी किनारी असलेल्या जेटटींचा विकास करुन त्यामधून जलवाहतूक सेवा सुरु करावी, यासाठी देखील आमदार संदीप नाईक यांनी सरकारकडे मागणी लावून धरली आहे. या संबंधी त्यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्नही विचारला होता. राज्यातील सागरी किनारी असलेल्या जेट्टींचा विकास करुन त्यामधून जलवाहतूक सुरु करण्यास महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मे २०१६मध्ये तत्वतः मंजुरी दिली आहे. प्रवासी फेरीसेवा, रो रो सेवा, मालवाहतूक आणि पर्यटनासाठी खाजगी उद्योजकांना वापरण्यास देण्याकरीता किनारपट्टीवरील जेट्टींचे प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सेवांसाठी सुयोग्य जेट्टींची निवड करण्याचे काम सुरु असून यानंतर निविदा प्रक्रीयेच्या माध्यमातून खाजगी उद्योजकांची निवड करण्यात येणार आहे. जल वाहतूक महामंडळ स्थापन करण्यासाठी महामंडळाची व्याप्ती, कामाचा वाव, अंमलबजावणी यंत्रणा इत्यादी बाबी ठरविण्याची कार्यवाही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने नियुक्त केलेल्या सल्लागारामार्फत सुरु आहे.