श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या दि. 08/11/2016 अधिसूचनेव्दारे 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून रु.1000/- व रु.500/- मुल्यांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आलेल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने दि. 10 नोव्हेंबर 2016 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार काही अटी व शर्तींच्या अधीन राहून महानगरपालिका / नगरपालिका यांच्या विविध करांचा भरणा / थकबाकी भरण्यासाठी जुन्या चलनातील नोटांच्या स्वरुपात शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर 2016 रोजी मध्यरात्रीपर्यंत कर भरणा करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे.
याकरीता मालमत्ता कर, पाणीपट्टी इत्यादी करांची वसुली करण्याबाबतची मागणी 8 नोव्हेंबर 2016 पूर्वी केलेली असावी. भरणा करून घ्यावयाच्या संबंधित कराची रक्कम ही मागणी केलेल्या रक्कमेच्या मर्यादेत असावी. ही रक्कम विवादीत (Disputed) नसावी, तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रतिसाक्षित रक्कमेचा (Under Protest) रक्कमेचा भरणा करून घेण्यात येणार नाही. अशा पध्दतीने जमा करून घेण्यात येणारी करांची रक्कम ही ना परतावा योग्य (Non Refundable) असणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे.
ही कराची रक्कम ज्याच्या नावाने कराच्या वसुलीबाबत मागणी करण्यात आलेली आहे. त्या व्यक्तीने स्वत: अथवा त्या व्यक्तीने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस भरणा करता येईल. मात्र सदर त्रयस्थ पक्षाने रक्कमेचा भरणा करताना स्वत: च्या ओळखीचा वैध पुरावा तसेच प्राधिकार पत्र (Authorization Letter) सादर करणे आवश्यक राहील.
शासन परिपत्रकाव्दारे सूचित करण्यात आल्यानुसार काही अटी व शर्तींच्या अधिन राहून नागरिक महानगरपालिकेशी संबंधित विविध कर / थकबाकी यांचा भरणा रु.1000/- व रु.500/- मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर करून भरू शकतात. त्याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेची कर भरणा कार्यालये शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर 2016 रोजी मध्यरात्रीपर्यंत सुरु राहतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी व आपला महानगरपालिकेशी संबंधित विविध करांचा भरणा / थकबाकी भरणा करावा असे आवाहन करण्यात येत आहे.