भाईंदरमधील खाजगी शाळांच्या शिक्षकांना आगाऊ वेतन
- भाईंदर : मीरा-भाईंदरमधील काही खाजगी शैक्षणिक संस्था चालकांनी आपले काळे धन पांढरे करण्याच्या उद्देशाने शाळांतील शिक्षकांसह कर्मचा-यांना आगाऊ महिन्यांचे वेतन देण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारे जुन्या नोटा बदलण्याची शक्कल काही शैक्षणिक संस्था चालकांनी लढविल्याने त्यांच्या काळ्याचे पांढरे करण्याच्या फंड्याची चर्चा शिक्षकांत सुरू झाली आहे.
-
शहरातील काही खाजगी शैक्षणिक संस्था चालकांनी आपल्याकडील काळ्या धनातील हजार, पाचशेच्या नोटा बदलण्यासाठी नामी युक्ती शोधली आहे. त्यात त्यांनी आपल्याकडील काळे धन एकाचवेळी बँकांत जमा केल्यास आयकर विभागाचे झिंगाट मागे लागणार असल्याची धास्ती घेतली आहे. त्यामुळे या नोटांचे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकल्याने त्यांनी ते थेट वेतनाद्वारे पांढरे करण्याची शक्कल लढविली आहे. त्यांनी दिवाळी निमित्त सुट्टीवर असलेल्या शिक्षकांना शाळेच्या कार्यालयात बोलावून दोन ते तीन महिन्यांचे आगाऊ वेतन देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे संस्था चालकांकडे असलेल्या बेहिशेबी नोटा विनासायास वटविल्या जात आहेत. पुढे वेतनाद्वारे दिलेले काळे धन पांढरे करण्यासाठी अडव्हान्स वसूलीचा फंडाही या संस्थाचालकांकडून अंमलात आणला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनपेक्षितपणे हाती आलेल्या आगाऊ वेतनामुळे शिक्षकांची मात्र खरी दिवाळी सुरू झाल्याची चर्चा त्यांच्यातच रंगली आहे. अशाप्रकारे शैक्षणिक संस्था चालकांचे काळे धन मार्गी लागत आहे. केंद्र सरकारने गृहिणींना अडीज लाख रूपये एकाचवेळी बँकांत जमा करण्याची सवलत दिल्याने वेतनाद्वारे मिळालेले काळे धन पांढरे होण्याला बळ मिळाले आहे. शिक्षकांनी मात्र हे वेतन कोणतेही आश्चर्य व प्रश्न उपस्थित न करता हर्षोल्हासाने स्विकारले असून पुढचे पुढे पाहू, असाही सुर आळवण्यास सुरुवात केली आहे.