मीठाचा तुटवडा ही निव्वळ अफवा, विश्वास ठेवू नये
- मुंबई : 500 आणि 1000 रूपयांच्या बंदीच्या त्रासातून नागरिक सावरत असतानाच महाराष्ट्रासह, दिल्ली, उत्तरप्रदेशमध्ये मीठाची कमतरता असल्याची अफवा वा-यासारखी पसरली आहे. देशात मीठाची कमतरता नसून ही निव्वळ अफवा आहे असं ग्राहक सेवा विभागाकडून स्पष्ट कऱण्यात आलं आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं असून अफवा पसरवणा-यांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं असून अफवा पसरवणा-यांवर कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले.
-
दरम्यान, मीठाच्या कमतरतेची अफवा वा-यासारखी पसरली असून या अफवेनंतर दुकानांमध्ये लोकांनी मीठ खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेशसह राज्यात मुंबई, जळगाव, बुलढाणा, अहमदनगर, मालेगाव आदी शहरांमध्ये मीठाच्या कमतरतेच्या अफवांचा पेव फुटला आहे. या अफवेचा फायदा घेत दुकानदारांनीही मीठाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले असून 200 ते 300 रुपये किलोंनी विकण्यास सुरुवात केली.मीठाचा तुटवडा होणार असल्याची निव्वळ अफवा आहे, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, मीठाचा तुटवडा नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनी दिलं आहे तर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.