नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविल्या जाणा-या नागरी सुविधांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन त्यांचा योग्य रितीने वापर करणे ही नागरिकांचीही जबाबदारी असून आपल्या नवी मुंबई शहराच्या विकासासाठी शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग अपेक्षित असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांशी थेट सुसंवाद साधला.
याप्रसंगी नागरिकांकडून आलेल्या समस्यांमध्ये अतिक्रमणविषयक तक्रारींबाबत बोलताना नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले तसेच नागरिकांनी रितसर बांधकाम परवानगी घेऊनच बांधकाम करावे असे सांगितले. याकरीता महानगरपालिकेने बांधकाम परवानगी प्रक्रियेत सुलभता आणत सादर करावयाच्या कागदपत्रांची संख्या कमी करून 40 वरून 7 इतकी कमी केल्याची माहिती त्यांनी दिली व त्याचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन केले.
पार्कींगविषयी महापालिका आणि वाहतुक पोलीस विभाग यांच्या वतीने संपूर्ण शहरासाठी पार्कींग नियोजन केले जात असल्याची माहिती देत याविषयी नागरिकांकडून सूचना, हरकती मागविण्यात आल्या असून नागरिकांनी लेखी स्वरूपात / वेबसाईटवर आपल्या मौल्यवान सूचना कराव्यात, हरकती नोंदवाव्यात असे आवाहन आयुक्तांनी केले. पार्कींग समस्येवर मार्ग काढताना नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, योग्य जागी गाडी पार्क करावी, आपल्या सोसायटीच्या आवारातील पार्कींग जागांचा योग्य वापर करावा असे ते म्हणाले.
शहर स्वच्छतेसाठी महापालिका काम करते आहे, यामध्ये नागरिकांनीही कचरा योग्य जागीच टाकावा, कुठेही थुंकू नये, ओला- सुका असे कच-याचे निर्माण होतो त्या ठिकाणीच म्हणजे घरापासूनच वर्गीकरण करावे असे त्यांनी सांगितले. नागरिकांना आपल्या नागरी सुविधाविषयीच्या अडचणी घरबसल्या सोडविण्यासाठी www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अत्याधुनिक ‘तक्रार निवारण प्रणाली’ (public grievance system) कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांनी या कार्यप्रणालीचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले. यामध्ये नागरिकांना विशिष्ट कोड नंबर दिला जातो त्याव्दारे आपल्या तक्रारीवरील कार्यवाही कुठपर्यंत आली हे जाणून घेता येते, तसेच तक्रार निवारण झाल्यानंतर समाधान झाले नाही तर नागरिक पुन:श्च तक्रार दाखल करू शकतात अशी माहिती त्यांनी दिली.
शहर विकासामध्ये नागरिकांचे संपूर्ण योगदान अपेक्षित असून नागरिकांनी आपला कर वेळेवर भरावा जेणेकरून त्या निधीतून नागरिकांसाठीच अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील असे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी आपल्याला शहर पुढे न्यावयाचे असेल तर नागरी सुविधांचा वापर नागरिकांनी चांगल्या रितीने करायला हवा असे ते म्हणाले. वॉक विथ कमिशनर उपक्रमाला सर्वच ठिकाणी लाभलेल्या उत्तम नागरिक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करीत यामधून नागरिकांच्या समस्या थेट समजून घेता येतात व त्यांच्या सूचनांमधून भविष्याच्या नियोजनासाठी संकल्पना भेटतात असे ते म्हणाले. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक आयुक्तांच्या भेटीसाठी अतिशय उत्साहाने सकाळी 6 वाजल्यापासून उपस्थित होते.