संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना साकडे
नवी मुंबई : सीबीडी-बेलापुर येथे सोमवारी लोर्कापण झालेल्या अपोलो रूग्णालयात स्थानिकांना रोजगार देण्यासोबत नवी मुंबईतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यल्प दरात उपचार मिळवून देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
बेलापुर येथील सेक्टर 23 मधील प्लॉट 15 वरील अपोलो रूग्णालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण झाले. यावेळी त्यांना सावंत यांनी निवेदन सादर केले. यावेळी उपस्थित असणारे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत, स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनाही स्वतंत्रपणे निवेदन सादर करत आपली मागणी सावंत यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सावंत पुढे म्हणाले की, नवी मुंबई शहराची निर्मिती शासकीय गरजेतून झालेली आहे, हे आपणास माहिती आहेच. नवी मुंबई विकसित करताना 1970च्या दशकामध्ये भूसंपादन करताना येथे विकसित होणारे उद्योगधंदे, व्यवसाय, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील रोजगार व अन्य सुविधा देताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने अग्रक्रम देण्याचे सिडकोने मान्य केले आहे. त्याची अंमलबजावणी या अपोलो रूग्णालयाबाबत होणे आवश्यक असतानाही सिडको व अपोलो रूग्णालय यांच्यात झालेल्या करारनाम्यामध्ये तसा कोणताही उल्लेख पहावयास मिळत नसल्याचे सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
सिडकोकडून बाजार भावापेक्षाही कमी दराने विकत घेतलेल्या जागेवर उभारण्यात आलेल्या रूग्णालयाचा सुपर स्पेशालिटी रूग्णालयात समावेश होणार आहे. हे रूग्णालय पूर्णपणे व्यावसायिक तत्वावर चालविले जाणार असून यात नफा हाच या व्यवस्थापनाचा हेतू असणार आहे. तथापि या रूग्णालयात नवी मुंबईतील स्थानिक भूमीपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना आणि आर्थिकदृष्ट्या गोरगरीब घटकांवर सवलतीच्या दरात उपचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण या रूग्णालयातील आरोग्य सुविधेच्या 30 टक्के आरक्षण हे नवी मुंबईतील गोरगरीब घटकांकरता असावे, याविषयीही आपण रूग्णालय व्यवस्थापणाला निर्देश द्यावेत, तसेच आरक्षण ही बाब उपचाराकरता राखीव असली तरी खाडी किनारी वसलेल्या या नवी मुंबई शहरामध्ये सध्याच्या काळात वाढते साथीचे रोग आणि महाग होत चाललेली आरोग्य सुविधा या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमीपुत्रांना व नवी मुंबईकरांना काही प्रमाणात मोफत उपचारही या रूग्णालय व्यवस्थापणाकडून होणे आवश्यक आहे.आपण मागणीमागील गांभीर्य आणि गोरगरीब भुमीपुत्र व अन्य नवी मुंबईकरांविषयी आमची असलेली प्रामाणिक तळमळ समजून घ्यावी आणि संबंधित रूग्णालयाला स्थानिक भुमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांना व नवी मुंबईतील अन्य रहीवाशांमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना उपचारसुविधेकरता 30 टक्के आरक्षण तसेच काही प्रमाणात मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे रूग्णालय व्यवस्थापणाला निर्देश द्यावेत अशी मागणी सावंत यांनी निवेदनातून केली आहे.
हे रूग्णालय 1200 बेडचे असून नवी मुंबईतील सर्वात मोठे असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असणार आहे. या रूग्णालयाकरता सिडकोने बाजारभावापेक्षाही कितीतरी कमी दराने म्हणजे कवडीमोल दराने जागा उपलब्ध करून दिलेली आहे. येथील प्रकल्पग्रस्तांना मिळणार्या साडेबारा टक्के भुखंडातून पावणे चार टक्के जागा शासनाने विकसिकरणाच्या नावाखाली काढून घेताना त्यांच्या हातात अवघे पावणे नऊ टक्केच भुखंड त्यांच्या हातात टेकवला आहे. हे पावणे चार टक्के रूग्णालय, मैदान, मंदिर, उद्यान व अन्य सामाजिक कामासाठी कापून घेतले आहे. एका अर्थाने हे रूग्णालयदेखील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर वसलेले आहे. नवी मुंबईतील सर्वाधिक मोठे रूग्णालय म्हणून या रूग्णालयात कर्मचारी वर्गही तितकाच मोठ्या संख्येने लागणार आहे. त्यामुळे रूग्णालयात कर्मचारी भरती करताना आपण स्थानिक प्रकल्पग्रस्तांना तसेच नवी मुंबईमधील अन्य रहीवाशांनाही प्राधान्यांने सामावून घेण्याचे निर्देश आपण रूग्णालय व्यवस्थापणाला द्यावेत, मात्र स्थानिक भुमीपुत्रांना व नवी मुंबईतील अन्य घटकांना रोजगार देताना कंत्राटी तत्वावर न देताकायम तत्वावर रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. सिडको व रूग्णालय व्यवस्थापन यांच्यात सुधारीत करारनामा होवून यामध्ये उपचाराकरता आरक्षण, हलाखीची आर्थिक परिस्थिती असणार्यांना मोफत उपचार व रोजगारामध्ये नवी मुंबईकरांना प्राधान्य या घटकांचाही समावेश करण्याचे आपण सिडकोला आदेश द्यावेत,अशी मागणी सावंत यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यावेळी रवींद्र सावंत यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोष शेट्टी, माजी नगरसेवक अमित पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.