श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : जुनाट विद्युत केबल्स, उंदरांचा सुळसुळाट तसेच विद्युत दाबातील चढ उतार याची फार मोठी किंमत शिवम सोसायटीतील रहीवाशांना मंगळवारी चुकवावी लागली. सोसायटीचे पदाधिकारी सोपान सावंत यांनी तत्परता दाखवित सोसायटीचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. अन्यथा नेरूळ सेक्टर 16मधील ए टाईपच्या पंचरत्न सोसायटीसारखी दुर्घटना शिवम सोसायटीमध्ये घडली असती, अशी भीती स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शिवम सोसायटीतील बी-3, ए विंगमधील तळाशी असलेल्या विद्यतु डीपीमध्ये धुर मोठ्या प्रमाणावर येवू लागल्याचे तिसर्या मजल्यावर राहत असलेले रहीवाशी व सोसायटीचे पदाधिकारी सोपान सावंत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ बी-4 बी विंग लगत असलेल्या विद्युतच्या मुख्य डीपीकडे धाव घेत सोसायटीचा विद्युत पुरवठाच खंडीत केला. त्याचवेळी लव्हेकर, अक्षय धेंडे, परेश तांबे यांच्यासह सोसायटीतील अन्य मुलांनी व रहीवाशांनी धुर निघत असलेल्या ठिकाणी वाळूचा मारा करत डीपीतील वायरींना लागलेली आग विझविली. रहीवाशांनी स्थानिक नगरसेविका सुजाता सुरज पाटील यांना या घटनेची कल्पना दिली असता, त्यांनी तात्काळ एमएसईबीचे अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिकेच्या अग्निशमनची गाडी घटनास्थळी पाठवून दिली.
उंदरांच्या त्रासाने शिवम सोसायटीतील रहीवाशी त्रस्त झालेले असून उंदरांनी वायरी व केबल्स कुरतडणे, विद्युत डीपीमध्ये उंदरांचे वास्तव्य यामुळे शिवम सोसायटीतील विद्युत डीपीमध्ये यापूर्वीही आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग 86 चे वॉर्ड अध्यक्ष यशवंत तांडेल व महादेव पवार यांनी तात्काळ शिवम सोसायटीला भेट देत रहीवाशांना दिलासा देण्याचे काम केले.