नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, पदपथ, मार्जिनल स्पेस अतिक्रमणमुक्त ठेवण्यासोबतच अनधिकृतरित्या बांधलेल्या इमारती निष्कासित करून नवी मुंबई शहर अतिक्रमण विरहीत करण्याच्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार से. 23, नेरूळ – दारावे येथील श्रीधर म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे व ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सुरु असलेल्या दोन मजली अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही इमारत जमीनदोस्त केली. याकरीता काँक्रीट क्रशर मशिनचा वापर करण्यात आला होता.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी सुभाष अडागळे व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या मोठ्या प्रमाणावरील बंदोबस्तात या अनधिकृत इमारतीवर अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात आली.