नवी मुंबई /जयश्री पाटील :- ८८७९४८४८३६
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विरोधात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागामार्फत धडक कारवाई करण्यात येत असून आज घणसोली विभागात सिध्दार्थ नगर, राबाडा येथे सुभाष शिंदे व इतर यांच्यामार्फत सुरू असलेल्या पाच मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या इमारतीला एम.आर.टी.पी. ॲक्ट1966 नुसार नोटीस बजावण्यात आली होती. परंतु या नोटीशीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. याकरीता काँक्रीट क्रशर मशिनचा वापर करण्यात येऊन इमारतीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.
याशिवाय त्या बाजुलाच राजू शिंदे व शंकर हुजगे यांच्या दोन इमारतींचे विनापरवानगी बांधकाम सुरू होते. या दोन अनधिकृत इमारतींच्या बांधकामावरही ब्रेकरच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली, घणसोली विभागाचे सहा. आयुक्त सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे आणि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या मोठ्या प्रमाणावरील बंदोबस्तात या अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात आली.