जयश्री पाटील :- ८८७९४८४८३६
मुंबई : महापालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात पाणी गळती हेात आहे. गेल्या वर्षभरात पालिकेने पूर्व व पश्चिम उपनगरातील सुमारे ४ हजार ४७४ ठिकाणी पाणी गळती रोखण्यासाठी कामे केली आहेत. मात्र मात्र शंभर टक्के गळती रोखण्यात पालिकेला यश आलेलं नाही. त्यामुळे या विभागातील पाणी गळती रोखणे, जुन्या गंजलेल्या जलवाहिन्या बदलणे आदी कामांसाठी पालिका प्रशासनाकडून सुमारे ४५ कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार असून, बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
महापालिका विविध जलस्तोत्रांतून मुंबई शहराला प्रतिदिन ३७५० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा करते. मुंबईत पाणी गळती आणि पाणी चोरीची मोठी समस्या आहे. साधारणपणे २७ ते ३० टक्के पाणी गळतीचे प्रमाण आहे. पाणी गळतीमुळे दररोज हजारे लीटर पाणी वाया जात आहे. पाणी गळती रोखण्यासाठी पालिकेकडून कोटयावधी रूपये खर्च केले जात आहे. मात्र अजूनही पाणी गळती थांबलेली नाही. पूर्व व पश्चिम उपनगरातील आठ ठिकाणी पाणी गळती रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने कंत्राटदार नेमले होते. साडेचार हजार गळती आणि २७० ठिकाणी गंजलेल्या जलवाहिन्या बदलण्याची कामे केल्यानंतरही या विभागात अजूनही पाणी गळती आणि जुन्या गंजलेल्या जलवाहिन्या बदलणे आदी कामे करावयाची आहेत. कंत्राटदाराची मुदत संपल्याने हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.