जयश्री पाटील /८८७९४८४८३६
** स्टुलमनच्या सुधारित यादीमध्ये जुन्या यादीत नसलेल्या उमेदवारांचा समावेश
** पालिका आयुक्त संजीव जयस्वालांचे नजीब मुल्लांना आव्हान
** प्रशासन परस्पर निर्णय घेत असेल तर सभागृह कशाला हवे
ठाणे : ठाणे महापालिकेच्या विविध आस्थापनांवर होणार्या भरती प्रक्रियेवरच सभागृहात लोकप्रतिनिधींकडून गंभीर स्वरूपाचे आक्षेप घेण्यात आले असून स्टुलमन आणि पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांमध्ये झालेल्या वार्डबॉयच्या भरतीमध्ये शासनाच्या अध्यादेशाचेच उल्लंघघन करण्यात आल्याचा मुद्दा मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये लोकप्रतिनिधींकडून उपस्थित करण्यात आला. स्टूलमनच्या सुधारित यादीमध्ये तर जुन्या यादीमध्ये नसलेल्या उमेदवारांची नावे टाकण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून नजीब मुल्ला यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. मात्र नजीब मुल्ला यांनी अशी नावे जाहीर केल्यास २४ तासांच्या आत यासंदर्भातील अहवाल सादर केला जाईल आणि मुल्ला यांची माहिती खोटी ठरल्यास त्यांनी आपले आरोप सभागृतच मागे घेण्याचे आव्हान पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहात दिल्याने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते.
आपल्या वादग्रस्त कारभारामुळे नेहमीच चर्चेत असणार्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील वार्डबॉयची भरती देखील वादाच्या भोवर्यात सापडली आहे. कोणत्याही प्रकारची जाहिरात न काढता एकाच व्यक्तीच्या शिफारशीखाली एकाच गावातील १८ लोकांची भरती हॉस्पिटलमध्ये वार्डबॉय पदासाठी करण्यात आली असल्याचा प्रकार स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी उघड केला होता. त्यामुळे ही भरती प्रक्रियाच रद्द करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी प्रशासनाला दिले आहेत. सभापतींच्या आदेशानंतरहि भरती करण्यात आलेले वर्डबॉय अजूनही काम करत असल्याने मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ झाला. स्थायी समितीमध्ये वर्ड बॉयची भरती रद्द करण्याचे आदेश असताना अजूनही सर्व वर्ड बॉय कामावर रुजू असल्याचा मुद्दा नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. तर हि भरती प्रक्रिया राबवताना जाहिरात करण्यात आली नसून शासनाच्या अध्यादेशाचे देखील पालन करण्यात आले नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. रामभाऊ तायडे यांनी हॉस्पिटलच्या डीन, अधीक्षक कोरडे यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी केली. ही संपूर्ण भरती तात्पुरती असल्याचे अतिरिक्त आयुक्त रणखांब यांनी सांगूनही समाधान न झाल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करून चौकशी करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी सभागृहामध्ये दिले.
*******************************
स्टूलमन भरतीसंदर्भात यापूर्वी सदस्यांकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांवर एक समिती स्थापन करून चौकशी अहवाल सभागृहासमोर सादर करावा असा ठराव झाला असतानाही हा अहवाल सभागृहासमोर न आणता परस्पर आयुक्तांकडे पाठवल्याच्या मु्द्यावरून सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा चांगलाच गाजला. भरती संदर्भात आक्षेप आणि तक्रारी या समितीकडून मागवण्यात आल्या होत्या. मात्र त्या कोणत्या स्वरूपातील तक्रारी होत्या असा प्रश्न नगरसेवक हिरा पाटील यांनी सभागृहामध्ये उपस्थित केला. प्रशासनाकडून उत्तर देताना उपायुक्त मुख्यालय निपाणी यांनी यासंदर्भात चौकशी अहवाल तयार करून तो आयुक्तांना सादर केला असल्याची माहिती दिली. निपाणीच्या या उत्तरानंतर नजीब मुल्ला यांनी आक्षेप घेत ठराव सभागृहाचा असताना या ठिकाणी अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रशासन परस्पर निर्णय घेत असेल तर सभागृह कशाला हवे असा मुद्दा त्यांनी मांडला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी अहवालामधील गोष्टी आणि सुधारित यादीबद्दल माहिती देऊनही जुन्या यादीमधील नसलेली नावे नव्या यादीमध्ये टाकण्यात आली असल्याचा आरोप सभागृहात प्रशासनावर केला. अखेर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खुलासा करत अशी नावे असल्यास नजीब मुल्ला यांनी जाहीर करावी आणि माहिती चुकीची निघाल्यास सभागृतच आरोप मागे घ्यावे असे आव्हान दिले. महापौरांनी मध्यस्थीची भूमिका चौकशी समितीचा हा अहवाल सभागृहा समोर सादर करून चुकीच्या पद्धतीने यादी केली असेल तर समंधितांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी सभागृहात दिले.