जयश्री पाटील /८८७९४८४८३६
** प्रशासन कोणाच्या इशार्यावर चालते, सध्या महापालिकेत काय चालू आहे याची आपणास कल्पना आहे…
** महापालिका प्रशासनाने आता शिक्षकांच्या उद्रेकाचा अंत पाहू नये
** घोटाळे झालेच नाहीत तर हे काय बाहेर काढणारढ़
नवी मुंबई ः महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील १ली ते ८वी या प्राथमिक विभागातील १३५ तुकड्यांना शिक्षक नसल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण विभागावर होणारा खर्च कमी केल्याच्या बढाया मारून स्वतःची पाठ थोपटून घेणार्या महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने शिक्षकांचा उद्रेकाचा अंत पाहू नये, अन्यथा महापौर पद बाजुला ठेवून आपणच महापालिका शाळेत शिकणार्या ३५ हजार विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा दस्तुरखुद्द महापौर सुधाकर सोनवणे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
महापालिकेतील अधिकारी आणि नगरसेवक सगळेच भ्रष्टाचारी आहेत आणि आपण मात्र धुतल्या तांदळातले आहोत अशा प्रकारचा समज आयुक्त आणि महापालिका प्रशासन मिडीयाला हाताशी धरून सर्वत्र पसरवत आहेत.
महापालिकेच्या शाळेत गोरगरीबांची मुले शिक्षण घेतात. त्यांना वर्ष संपत येत असतानाही अजून दप्तर, बुट, वह्या आणि इतर शालेय साहित्याचे वाटप झालेले नाही. दुसरीकडे महापालिकेच्या शाळांमधील १ली ते ८वी या प्राथमिक विभागातील १३५ तुकड्यांना शिक्षक नसताना प्रशासन गप्प बसून आहे. ठोक मानधनावर असलेल्या १२० शिक्षकांना आयुक्तांनी एका रात्रीत काढून टाकले. सदर काय प्रकार सुरू आहे. आयुक्तांच्या अशा हेकेखोर वागणुकीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे. प्रशासनाचे ऐकून घेतले एवढे, आता संयमाचा अंत झाला आहे. महापालिका प्रशासनाने महापौर म्हणून तरी माझ्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. प्रशासनाने शिक्षणाचा खेळ खंडोबा करून ठेवला असून आयुक्त विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. महापालिकेत प्रशासनाने सुरू केलेली दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही, असा सूचक इशाराही महापौरांनी दिला आहे.
दरम्यान, जे ठोक मानधनवरील शिक्षक न्यायालयात गेले त्यांना वगळून उर्वरीत शिक्षकांना शिक्षण मंडळाने नव्याने घेतले पाहिजे. त्या शिक्षकांमुळे सर्वांचे नुकसान करू नये असे महापौर सोनवणे म्हणाले. प्रशासन कुणाच्या इशार्यावरून चालते. सध्या महापालिकेत काय सुरू आहे, याची आपल्याला कल्पना आहे. पण, विद्यार्थ्यांच्या उज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी आपण महापौर पदाकडे न बघता येत्या आठवड्यात पालक वर्गाला घेऊन आंदोलन करणार
असल्याचेही महापौर सुधाकर सोनवणे यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिकेत आतापर्यंत झालेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची आवई आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उठविली आहे. मात्र, भ्रष्टाचार सिद्ध करण्यात आयुक्त अपयशी ठरले आहेत. जे लोकप्रतिनिधी आयुक्तांच्या कार्यप्रणाली विरोधात आवाज उठवितात त्या लोकप्रतिनिधींची कामे करायची नाहीत, त्यांची अनधिकृत बांधकामे जाणुनबूजून शोधून त्यांच्या मागे अतिक्रमण विभागाचा ससेमिरा लावायचा एवढेच काम आयुक्तांनी आल्यापासून केले आहे. परंतु, घोटाळेच झाले नाहीत, तर बाहेर काय काढणार असं म्हणत महापौर सुधाकर सोनवणे यांना थेट शिक्षण विभागात प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारभारवर टिका केली.