जयश्री पाटील : 8879484836
नवी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक भाजपा-सेना युती साकारत आहे त्या पार्श्वभूमीवर, बेलापूर किल्ला येथील प्राचीन श्री गोवर्धनी माता मंदिर येथून गुरुवारी, दि. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जल व माती कलश घेऊन ढोल-ताशांच्या गजरात
वाशी येथील शिवाजी चौक पुतळा येथे भव्य नेत्रदीपक सोहळा सायंकाळी सात वाजता होणार आहे. या कलशाच्या सोहळ्यात शिवछत्रपती यांची वेशभूषा परिधान केलेल्या मुलांचा सहभाग असणार असून या सोहळ्यात मोठया संख्येने नवी मुंबईतील शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे व नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी तुर्भे येथील पत्रकार परिषदेत बोलताना केले.
या परिषदेत भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बोलताना पुढे सांगितले कि, शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने राज्यात भारतीय जनता पार्टीची सरकार आली. निवडणुकीपूर्वी आमच्या पक्षाने स्पष्ट आश्वासन दिले होते की, सत्तेवर आल्यास अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभे करू, त्यासाठी आवश्यक परवानग्या आपल्या राज्य सरकारने 2 वर्षात मिळवल्या आहेत. आता स्मारकाचे भूमिपूजन करण्याचा सुवर्ण मंगल क्षण आला असून येत्या शनिवार, दि. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईजवळ अरबी समुद्रात सदर स्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन होणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या पार्श्वभूमीवर बेलापूर किल्ला येथील प्राचीन श्री गोवर्धनी माता मंदिर नवी मुंबई महापालिका मुख्यालय येथून पवित्र माती व जल यांचे कलश रथ घेऊन ढोल ताशांच्या गजरात वाशी येथील शिवाजी चौक येथे भव्य कलश सोहळा होणार आहे. या मिरवणुकीत शिवछत्रपतींची वेशभूषा परिधान केलेल्या मुलांचा , तसेच बारा बलुतेदार यांची वेशभूषा असल्याचा सहभाग असणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी सकाळी चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे विविध जिल्ह्यातील रथांचे एकत्रीकरण होऊन शिवस्मारक भूमिपूजन स्थळी प्रस्थान होणार आहे. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडिया येथे कलश हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिवछत्रपती कलश हस्तांतरण गिरगाव चौपाटी येथे शनिवार, दि. 24 डिसेंबर 2016 रोजी दुपारी होऊन मुंबई बांद्रा येथील बि.के.सी मैदान येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी बोलताना दिली. या नेत्रदिपक भव्य सोहळ्यास बेलापूर किल्ला नवी मुंबई महापालिका मुख्यालय येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता जास्तीत जास्त नवी मुंबईकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, भाजपा महामंत्री डॉ. राजेश पाटील, निलेश म्हात्रे, कृष्णा पाटील, डॉ. दिपक बैद आदी उपस्थित होते.