नवी दिल्ली :- देशभरात 3,185 कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न उघड झाले असून, यामध्ये 86 कोटींच्या नव्या चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत. केंद्र सरकारने आठ नोव्हेंबरपासून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर महिन्याभरात प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी ठिकठिकाणी धाडी टाकून कोट्यवधींचा काळा पैसा जप्त केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी नोटाबंदीनंतर देशभरात एकूण 677 सर्च, सर्वेक्षण आणि प्राप्तिकर कायद्यानुसार अनेकांची चौकशी केली. याबरोबर विभागाच्या अधिका-यांनी देशातील 3,100 हून अधिक कर चुकवणा-या वेगवेगळ्या कंपन्यांना आणि हवाला सारखे व्यवहार करणा-यांना नोटीस पाठविली.
प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, महिन्याभरात जवळपास 428 कोटींचे सोने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच यामध्ये 86 कोटी रुपये हे नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा असलेले आहेत. दरम्यान, 19 डिसेंबरपर्यंत अघोषित उत्पन्न 3,185 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर मनी लॉन्ड्रिंग, बेहिशेबी मालमत्ता, भ्रष्टाचार यांसदर्भातील 220 हून अधिक प्रकरणे ही सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडे सोपविली आहेत.