जयश्री पाटील /८८७९४८४८३६
* लोकनेते गणेश नाईक यांचे गौरवोद्गार * आयडब्ल्यूटीसी स्पर्धेचा शुभारंभ
नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने सलग चौथ्या वर्षी भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ एनएमएसएचे अध्यक्ष लोकनेते गणेश नाईक यांच्या शुभहस्ते सोमवारी सायंकाळी पार पडला. या स्पर्धेमुळे नवी मुंबईचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्तरावर वाढल्याचे गौरवोद्गार लोकनेते नाईक यांनी उद्घाटनाप्रसंगी उपस्थित खेळाडू आणि क्रीडा रसिकांसमोर काढले. भारतामध्ये क्रीडा रसिकांना क्रिकेट या खेळाचे अधिक आकर्षण आहे.
जागतिक पातळीवर अधिक आवडीने खेळल्या जाणार्या टेनिस या खेळातील जागतिक खेळाडूंचा खेळ नवी मुंबईकरांना आणि उगवत्या खेळाडूंना पाहता यावा यासाठी या स्पर्धेचे २०१३ साला पासून आयोजन करण्यात येत आहे. असे लोकनेते नाईक म्हणाले. या स्पर्धेमध्ये दरवर्षी जागतिक क्रमवारीतील वरच्यास्थानी असलेल्या खेळाडूंचा सहभाग वाढतो आहे या बद्दल समाधान व्यक्त करून ही स्पर्धा म्हणजे वैश्विक स्तरावरील एक सोहळा बनल्याचे मत त्यांनी मांडले. एनएमएसएचे उपाध्यक्ष डॉ. दिलिप राणे आणि त्यांचे सहकारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत असल्याबद्दल त्यांनी या सर्वांचे कौतुक केले. तसेच सहभागी खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त केल्या. दि २४ डिसेंबर पर्यंत वाशीतील एनएमएसए क्लबच्या गणेश नाईक आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टवर ही स्पर्धा रंगणार असून २२ देशांमधील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २५ हजार डॉलरची बक्षीसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते हवेमध्ये फुगे सोडण्यात आले. खेळाडूने शानदार संचलन केले. या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, एनएमएसएचे उपाध्यक्ष डॉ. दिलिप राणे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपायुक्त प्रशांत खैरे, माजी नगरसेवक राजू शिंदे, सुमंगल फडणवीस, दत्तु पाटील, अरुण पाटील, विजय रामभाऊ पाटील, विजय सीताराम पाटील, डॉ. अशोक पाटील, बारगुजे, एस.वी. लोटकर, एनएमएनएचे पदाधिकारी, वाशी वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजयकुमार लांडगे आणि क्रिडा रसीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.